नवी दिल्ली : करोना फैलाव रोखण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध आणखी आठवडय़ाभरापर्यंत वाढविण्याचा निर्णय रविवारी घेतला. रुग्णवाढीमुळे तमिळनाडू, कर्नाटकमध्ये आज, सोमवारपासून टाळेबंदी लागू करण्यात येत असून, देशातील जवळपास २६ राज्यांत टाळेबंदीसदृश निर्बंध लागू आहेत.

दिल्लीतील टाळेबंदी आणखी आठवडाभर वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केला. दिल्लीतील एकूण चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी सद्य:स्थिती पाहता टाळेबंदी वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. ही टाळेबंदी कठोर असेल. दिल्लीतील मेट्रो सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात १७ मेपर्यंत संचारबंदी असेल. याआधी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची मुदत आज, सोमवारी संपणार होती. मात्र, रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली. केरळमध्ये ८ मेपासून नऊ दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १६ मेपर्यंत निर्बंध लागू असतील. गोव्यामध्ये रुग्णवाढ होत असून, तिथे रविवारपासून टाळेबंदी लागू करण्यात आली.

नुकतीच निवडणूक झालेल्या तमिळनाडूमध्येही मोठय़ा प्रमाणावर रुग्णनोंद होत आहे. त्यामुळे राज्यात सोमवारपासून दोन आठवडय़ांची टाळेबंदी लागू करण्यात आली असून, निर्बंधांचे पालन नीट होते की नाही, याची पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंत्र्यांना दिले आहेत. देशात रोज चार लाखांहून अधिक रुग्णनोंद होत आहे. त्यामुळे देशव्यापी टाळेबंदी नसली तरी देशातील २६ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी निर्बंध लागू केले आहेत.

आठवडय़ाभरात पाचव्यांदा रुग्णसंख्या चार लाखांपार

देशात करोनाचा फैलाव वेगाने होत असून, आठवडय़ाभरात पाचव्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. देशात रविवारी करोनाचे ४,०३,७३८ रुग्ण आढळले, तर ४,०९२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या २,४२,३६२ वर पोहोचली.
उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७,३६,६४८ असून, एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण १६.७६ टक्के आहे.

निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात रुग्णवाढ

’उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. राज्यात ३० जानेवारी २०२० ते ४ एप्रिल २०२१ या कालावधीत करोनाचे ६.३ लाख रुग्ण होते.

’४ एप्रिलपासून पुढील ३० दिवसांत राज्यात आठ लाख नव्या रुग्णांची भर पडली. याच काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. या निवडणुकीसाठी १५, १९, २६ आणि २९ एप्रिल रोजी मतदान झाले.

’या चार टप्प्यांतील निवडणुकांसाठी नऊ कोटी मतदार होते. तसेच सुरक्षा दलांसह सुमारे १२ लाख सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते.