संरक्षण क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने भारताला नवीन F-21 फायटर विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे. खास भारतीय हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊन हे विमान बनवण्यात येणार आहे. लॉकहीड मार्टिन या विमानांचे उत्पादन भारतातच करण्यास तयार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया धोरणालाही चालना मिळेल.

अशी ऑफर अन्य दुसऱ्या कुठल्याही कंपनीने दिलेली नाही. लॉकहीड मार्टिन भारतीय हवाई दलाकडून ११४ फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत  आहे. आधी F-16 फायटर विमानांचे उत्पादन भारतात सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारतीय हवाई दलाकडून १५ अब्ज डॉलरचे कंत्राट मिळवण्यासाठी चार ते पाच कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.

कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीला ११४ विमानांचे उत्पादन भारतात करण्याची अट आहे. बंगळुरुच्या एअर शो मध्ये F-21 चे अनावरण करताना लॉकहीडने ही योजना जाहीर केली. भारताच्या गरजांनुसार या विमानाची बांधणी करु असे लॉकहीडने म्हटले आहे. F-21 आतून आणि बाहेरुन पूर्णपणे वेगळे आहे कंपनीचे रणनिती आणि व्यवसाय विकास विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले. टाटा अॅडव्हान्स सिस्टिमच्या साथीने कंपनी या विमानाची बांधणी करेल असे लाल म्हणाले.

लॉकहीडची अमेरिकन कंपनी बोईंग F/A-18, साब ग्रिपेन, डासूचे राफेल आणि युरोफायटर टायफून बरोबर स्पर्धा आहे. जगातील अनेक देश आज F-16 फायटर विमाने वापरतात. भारताकडून कंत्राट मिळणार असेल तर या संपूर्ण प्रकल्पाचे उत्पादन केंद्र आपण भारतात हलवू शकतो असे लॉकहीडने म्हटले होते. भारतातूनच अन्य देशांना F-16 ची निर्यात करण्याती कंपनीची योजना आहे.