इंडियन एअर फोर्सकडून फायटर विमानांची ऑर्डर मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या लॉकहीड मार्टिन कॉर्प कंपनीने F-16 विमानांमध्ये पाचव्या पीढीच्या लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान देण्याची तयारी दाखवली आहे. F-35 हे अमेरिकेचे पाचव्या पीढीचे फायटर विमान आहे. जगातील शक्तिशाली, अत्याधुनिक फायटर जेटमध्ये या विमानाचा समावेश होतो.

F-35 मधील अत्याधुनिक रडार सिस्टीम तसेच अन्य टेक्नॉलॉजी F-16 मध्ये देण्यास लॉकहीड मार्टिन तयार आहे. लॉकहीडचे भारतातील उपाध्यक्ष विवेक लाल यांनी ही माहिती दिली. चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता इंडियन एअरफोर्सला अत्याधुनिक फायटर विमानांची गरज आहे. फायटर विमानांचे हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लॉकहीड मार्टिन कॉर्प, साब एबी ग्रिपेन आणि बोईंग या तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.

लॉकहीडने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणातर्गंत स्थानिक भारतीय कंपनीसोबत मिळून भारतात विमान बांधणी करायची तयारी दाखवली आहे. कुठल्याही परिस्थितीत हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लॉकहीडने F-16 चा उत्पादन कारखाना अमेरिकेतील टेक्सासमधून भारतात हलवण्याची तयारी दाखवली आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेने ही F-16 विमाने पाकिस्तानलाही दिली होती. पण भारतासाठी बनवण्यात येणारी ही विमाने संपूर्णपणे वेगळी असतील. भारताच्या गरजा लक्षात घेऊन या विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. F-35, F-22 विमानांमधील तंत्रज्ञात F-16 मध्ये असेल असे विवेक लाल यांनी सांगितले.