तामिळनाडूतील विद्यार्थ्यांशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी साधलेला संवाद हे आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची तक्रार आली होती. तामिळनाडूचे मुख्य निवडणूक आयुक्त सत्यव्रत साहू यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी चेन्नई येथील स्टेला मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. तक्रारीनंतर स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे.

या अहवालानुसार, महाविद्यालयाच्या प्रशासनाने आयोगाच्या परवानगीनंतरच १३ मार्च रोजी राहुल यांचा विद्यार्थ्यांबरोबरील कार्यक्रम आयोजित केला होता. पूर्वपरवानगी घेतल्याने हा आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही. दरम्यान, राहुल यांनी या कार्यक्रमात भाषण केल्याप्रकरणी साहू यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अग्रिम अहवाल मागितला आहे.

उल्लेखनीय म्हणजे राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही महाविद्यालयीन प्रशासनाला राहुल गांधीच्या यांच्या कार्यक्रमाला कशी परवानगी दिली, असा सवाल राज्य सरकारने केला होता. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास नोकरीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.