काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूका ही वैचारिक लढाई असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष आजवर देशातील नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी उभा राहीला असल्याचे म्हटले.
तर दुसऱया बाजूला केवळ श्रीमंत व्यक्तींमुळेच देशाचा विकास होऊ शकतो या विचारसरणीची विरोधी पक्षांची भूमिका राहीली असल्याची टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.
निवृत्त सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. राहुल म्हणाले की, “निवृत्त सैनिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करुन घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची राहीली आहे. निवडणूका ही वैचारिक लढाई आहे. एका बाजूला देशातील प्रत्येक नागरिकाच्या हातात शक्ती दिल्याने, प्रत्येकाला सक्षम केल्याने संपूर्ण देश सक्षम आणि शक्तीशाली होऊ शकतो या विचाराने काँग्रेस पक्ष काम करत आहे. तर, दुसऱया बाजूला विरोधकांची विचारसरणी अशी आहे की, फक्त शक्तीशाली आणि श्रीमंत व्यक्तींमुळेच देश सक्षम होऊ शकतो. त्यांच्या कल्पनांमध्ये गरिबांना स्थानच नाही.” असा राहुल गांधी यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
निवृत्त सैनिकांसाठी सुरु केल्या ‘वन रँक वन पेंशन’चा उल्लेखही यावेळी राहुल गांधींनी केला, मी मोठी अश्वासने देऊ इच्छित नाही परंतु, जेव्हा तुमच्या काही मागण्या असतील त्यावेळी तुमच्यासाठी मनापासून प्रयत्न करत राहीन असेही राहुल म्हणाले.