आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पालकांना ‘देशभक्ती’ आणि ‘मोदीभक्ती’ या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे. शाळेतील विद्यार्थी आणि पालकांसमोर ते बोलत होते. त्यांच्या या कार्यक्रमाचे दिल्लीतील ७०० शाळांमध्ये थेट प्रक्षेपणही करण्यात आले.

ते पुढे म्हणाले, तुम्ही जर जनतेला कोणाला मतदान करणार असा प्रश्न केला तर ते मोदीजींना म्हणून उत्तर देतात. का मतदान करणार असे, विचारले तर ते म्हणतात, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आता तुम्ही हे ठरवा की, तुमचं प्रेम तुमच्या मुलांवर आहे की मोदींवर. जर तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर मतदान त्याला करा, जो तुमच्या मुलांसाठी काम करतो. जर तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम नसेल तर मोदींना मतदान करा..मोदींनी मुलांसाठी एक शाळाही उभारलेेली नाही. तुम्ही ‘देशभक्ती’ करू शकता किंवा ‘मोदीभक्ती’. दोन्ही एकाचवेळी करू शकत नाही.

यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही पालकांना ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, कोणीतरी मला म्हटलं की, निवडणुकीत ते मोदींना मतदान करणार आहेत… कारण ते चांगले वाटतात..! मी त्यांना म्हटलं की तुमचं जर तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर मतदान त्यांना करा ज्यांनी तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभारल्या. त्यामुळं मी सर्व मुलांना सांगू इच्छितो की, तुम्ही घरी जा आणि आपल्या पालकांना विचारा की तुम्ही आमच्यावर प्रेम करता की नाही ? जर त्यांनी तुमच्यावर प्रेम करतो असं म्हटलं तर त्यांना तुमच्यासाठी शाळा बांधणाऱ्यांना मत देण्यास सांगा.

केजरीवाल आणि सिसोदिया हे सर्वोदया कन्या प्रशालेतील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दिल्लीतील २५० सरकारी शाळांमधील ११००० नवीन वर्गखोल्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.