राजस्थानातील अल्वर जिल्हय़ातील घटना

राजस्थानातील अल्वर जिल्हय़ात गायीची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून जमावाने एकाची हत्या केली. अकबर खान (वय २८) असे मृताचे नाव आहे. या जिल्हय़ात जमावाकडून हत्या झाल्याची ही तिसरी घटना आहे.

अकबर आणि इतर एकजण दोन गायी हरयाणातील त्यांच्या खेडय़ात घेऊन जात असताना अल्वर जिल्हय़ातील लालवंडी परिसरातील जंगलात शुक्रवारी रात्री जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात अकबर खान याचा मृत्यू झाला आहे. गायींची तस्करी केल्याच्या संशयावरून जमावाने हा हल्ला केला. अकबर याचा सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. अकबर खान याला जखमी अवस्थेत रामगड रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधकांनी राजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वसुंधरा राजे यांच्या सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत नसल्याने हिंसाचार वाढला आहे, असा आरोप विरोधकांनी केला.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राजस्थानातील घटनेचा निषेध केला असला तरी १९८४ मध्ये शिखांच्या विरोधात देशातील सर्वात मोठा जमावाचा हिंसाचार होता, असेही त्यांनी नमूद केले. जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संसदेत बोलताना जमावाकडून होणारे हल्ले रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारांनी घ्यावी, असे नमूद केले होते.