लंडन ब्रिज परिसरातील रविवारच्या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी गटाने स्वीकारली असतानाच, पोलिसांनी लंडन शहरात ठिकठिकाणी छापे घालून अनेक लोकांना अटक केली आहे.

शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेत, व्हॅनमधील तीन हल्लेखोरांनी आधी लोकांच्या अंगावर गाडी घातली व नंतर चाकूने भोसकाभोसकी केली. यात सात जण ठार झाले होते. कंबरेला खोटे आत्मघातकी स्फोटक पट्टे घातलेल्या लोकांनी लंडन ब्रिजजवळच्या एका लोकप्रिय नाइटलाइफ हबमध्ये घातलेले हे थैमान म्हणजे तीन महिन्यांहून कमी कालावधीत ब्रिटनमध्ये झालेला तिसरा भीषण दहशतवादी हल्ला होता.

सोमवारी पहाटे पूर्व लंडनमध्ये दोन ठिकाणी छापे घालून काही जणांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी एका निवेदनात सांगितले. हे लोक इतर कुणासोबत काम करत होते काय हे जाणून घेणे आमच्यासाठी अतिशय प्राधान्याचे आहे, असे लंडनच्या पोलीसप्रमुख क्रेसिडा डिक यांनी टेलिव्हिजनला सांगितले.

या हल्ल्यासाठी वापरलेल्या व्हॅनची ‘अत्यंत काळजीपूर्वक’ तपासणी केल्यानंतर पोलिसांनी न्यायसाहाय्यक साहित्याचा फार मोठा साठा जप्त केला आहे. आता आम्ही तपासात बदल करून आम्हाला दिसणारी नवी वास्तविकता स्वीकारू, असे डिक म्हणाल्या.

हल्ल्याच्या संबंधात ११ लोक आपल्या ताब्यात असून, पूर्व लंडनच्या बार्किंग या उपनगरातील दोन ठिकाणांवर घातलेल्या छाप्यात या सर्वाना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी रविवारी या हल्ल्यासाठी ‘दुष्ट’ इस्लामी विचारसरणीला दोष देतानाच, जगभरातील दहशतवादाबाबतच्या ऑनलाइन मजकुराविरुद्ध कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच हल्लेखोर एकमेकांची नक्कल करत असल्याचा इशारा दिला. येत्या गुरुवारी होत असलेल्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार हल्ल्यात बळी पडलेल्यांबद्दल शोकभावना व्यक्त करण्यासाठी सत्ताधारी हुजूर पक्ष आणि मुख्य विरोधक मजूर पक्ष यांनी रविवारी बंद ठेवला होता. सोमवारी हा प्रचार पुन्हा सुरू झाला. निवडणूक ठरल्याप्रमाणेच पार पडेल, असा निर्धार पंतप्रधान मे यांनी व्यक्त केला आहे.

ब्रिटनच्या दहशतवादाला प्रतिसादात बदल व्हायला हवा, असे गेल्या जुलैमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी सहा वर्षे अंतर्गत मंत्री म्हणून काम पाहिलेल्या थेरेसा मे म्हणाल्या. दहशतवादाबाबत आपल्या देशात अतिशय जास्त सहिष्णुता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आयसिसच्या लढवय्यांच्या एका तुकडीने लंडन हल्ला केला, असे या गटाशी संबंधित ‘अमाक’ या वृत्तसंस्थेने सांगितले.

या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये कॅनडा व फ्रान्सच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश असून, फ्रान्सचे ७ नागरिक जखमी झाले आहेत. ८ पोलीस अधिकाऱ्यांनी तीन हल्लेखोरांविरुद्ध गोळीबाराच्या ५० ‘अभूतपूर्व’ फैरी झाडल्या, असे राष्ट्रीय दहशतवादविरोधी पोलीसप्रमुख मार्क रोले यांनी सांगितले.

लंडनच्या तीन हल्लेखोरांमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीचा समावेश

लंडनमध्ये भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या तीन चाकूधारी दहशतवाद्यांमध्ये मूळ पाकिस्तानच्या एका व्यक्तीचा समावेश असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले आहे. तीन हल्लेखोरांपैकी या एकाचीच आतापर्यंत ओळख पटली आहे. या हल्ल्यात सात जण ठार, तर ४९ लोक जखमी झाले होते.

‘अब्झ’ नावाने ओळख पटलेला हा इसम लंडनच्या दोन प्रमुख ठिकाणांवर भयावह हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांचा नेता होता अशी माहिती मिळाल्याचे वृत्त ‘दि मिरर’ने दिले. पूर्व लंडनच्या बार्किंग भागातील रहिवासी असलेला अब्झ (२७) हा पत्नी व दोन लहान मुलांसह राहत होता. पोलिसांनी रविवारी त्याच्या फ्लॅटवर छापा घातला. शनिवारी रात्री हल्ल्यानंतर लगेच पोलिसांनी हल्लेखोरांवर झडप घालून व त्यांच्यावर गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना ठार केले.

या वेळी अब्झ हा जमिनीवर पडला असल्याचे छायाचित्र ट्विटरवर टाकण्यात आले असता त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला ओळखले. अब्झ हा मुलगा असताना पाकिस्तानातून आला, मात्र ब्रिटनमध्येच मोठा झाला.

ब्रिटिश दहशतवाद्यांचे वर्तन व त्यांची प्रेरणा याबाबतच्या एका टीव्ही वृत्तचित्रात तो लंडनच्या एका पार्कमध्ये आयसिसच्या झेंडय़ाला वंदन करत असल्याचे दिसून आले होते. दोन वेळा त्याची माहिती दहशतवाद प्रतिबंधक अधिकाऱ्यांना कळवण्यात आली होती, असे ‘दि मिरर’च्या वृत्तात म्हटले आहे.