पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात घडलेल्या दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी त्यांनी माळीण गावातील दुर्घटनेबद्दल चर्चा केली असून, त्यांना परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पुण्याला जाण्याची सूचना केली आहे. दरम्यान, राजनाथसिंह रात्री ८ वाजता पुण्यात दाखल झाले. विधान परिषदेचे विरोधीपक्षे नेते विनोद तावडे यांच्यासह ते घटनास्थळाला गुरूवारी सकाळी भेट देणार आहेत.
आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या माळीण गावात बुधवारी पहाटे दरड कोसळल्याने गावाचा मोठा भाग ढिगाऱयाखाली गाडला गेला. सुमारे ४४ घरे ढिगाऱयाखाली गाडली गेली असून, आत्तापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) ३०० जवान घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे कामात गुंतले आहेत.