बारा महिने मिळणारे फळ म्हणजे केळं. अगदी उपावासापासून ते वेफर्सपर्यंत अनेक पद्धतीने केळं खाल्लं जातं. मात्र आता लखनौ स्थानकामध्ये प्रवाशांना केळं खाता येणार नाही. हो लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकात केळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. केळ्यांमुळे स्थानक स्वच्छ ठेवण्यात अडचणी येतात असं कारण देत रेल्वे स्थानक प्रशासनाने ही बंदी घालती आहे.

अनेक प्रवासी केळं खाऊन झाल्यानंतर रेल्वे स्थानकामध्येच त्याचे साल फेकून देतात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर कचरा होतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चारबाग रेल्वे स्थानकामध्ये केळं विकण्यावर बंदी घातली आहे. जर कोणी हा नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोर शिक्षा करण्यात येईल अशी ताकीद प्रशासनाने दिली आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकामध्ये केळ्यांच्या विक्रीवर आणि खाण्यावर बंदी घातल्याने विक्रेते आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे. या निर्णयामुळे स्थानकामध्ये फळविक्री करणाऱ्यांच्या कमाईवर परिणाम होणार असल्याचे मत येथील फळविक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. ‘इतर फळांच्या तुलनेच केळं स्वस्त असतं. तसेच केळं हे अनेक प्रवाशांच्या जेवणाचा भाग असतं. अनेक प्रवासी प्रवासादरम्यान केळी आवर्जून घेतात. मात्र आता बंदी घालत्यामुळे मागील पाच सहा दिवसांपासून फळांची विक्रीही कमी झाली आहे,’ असे मत या फळविक्रेत्याने व्यक्त केले आहे.

केळ्यापेक्षा प्लास्टिकने जास्त घाण होते

रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अयोग्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. केळ्यांपेक्षा प्लास्टिकमुळे रेल्वे स्थानकावर अधिक घाण होते असं प्रवाशांनी म्हटलं आहे. ‘केळ्याची सालांचे विघटन होते पण प्लास्टिकचे होत नाही त्यामुळेच रेल्वे स्थानकात विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी, वेफर्सची पाकिटं यांच्या विक्री बंदी घालायला हवी,’ असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.