लखनऊ विद्यापीठाच्या बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षाच्या अर्थशास्त्राचा पेपर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पेपरमध्ये विचारण्यात आलेले बहुतांश प्रश्न हे भाजपाच्या योजनांशी निगडीत आहेत. अनिवार्य प्रश्नांमध्ये तर दहा पैकी सात प्रश्न हे केंद्रीय योजनांवर आधारित आहेत. तर इतर दीर्घ प्रश्नही भाजपाच्या योजनांशी निगडीत आहेत. सोशल मीडियावर सध्या याचीच मोठी चर्चा सुरू आहे.

शनिवारी विद्यापीठाच्या बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षाचा अर्थशास्त्राचा पेपर होता. यामध्ये भारतीय अर्थशास़्त्रीय रचना याविषयाच्या पेपरमध्ये हे प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये पहिला प्रश्न अनिवार्य होता. त्यामध्ये दहा लघुत्तरी प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये सात प्रश्न हे केंद्रीय योजनांवर आधारित होते.

इतर चार गटातही केंद्राच्या योजनांचा प्रभाव राहिला. प्रत्येक गटात दोन प्रश्नं होती. यामध्ये दुसरा गटातील पहिला प्रश्न हा रोजगार निर्मितीसाठी भारत सरकारने कोणते उपाय योजले असा होता. तर दुसऱ्या प्रश्नात भारताच्या लोकसंख्येची निती विचारण्यात आली. तिसऱ्या गटात भारत सरकारच्या औद्योगिक नितीची वैशिष्ट्ये विचारण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा पेपर ज्या शिक्षकाने तयार केला आहे, ते स्वत: भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर ते स्वत:ला भाजपाचा प्रवक्ता असल्याचे सांगतात. परंतु, हा पेपर कोणी काढला हे विद्यापीठाने जाहीर केलेले नाही.

सोशल मीडियावर हा पेपर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. भाजपाच्या कार्यालयातून हा पेपर तयार करण्यात आला आहे, का असा सवाल विचारला जात आहे.

हे होते सात प्रश्न

– पंतप्रधान पीक विमा योजना
– दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना
– स्टार्टअप इंडिया
– डिजिटल इंडिया
– मुद्रा स्वास्थ्य कार्ड योजना
– पंतप्रधान जनधन योजना
– बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना