स्टालिन यांचे प्राप्तिकर विभागाला आव्हान

कोइम्बतूर : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर छापा टाकून दाखविण्याचे आव्हान द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी बुधवारी प्राप्तिकर विभागाला (आयटी) दिले.

मोदी यांच्या निवासस्थानी निश्चितपणे कोटय़वधी रुपये दडवून ठेवलेले आहेत, प्राप्तिकर विभागाची मोदी यांच्या निवासस्थानी छापा टाकण्याची तयार आहे का, असा सवाल स्टालिन यांनी एका जाहीर सभेत केला.

त्याचप्रमाणे प्राप्तिकर विभागात तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या निवासस्थानी छापे टाकण्याची हिंमत आहे का, तेथून त्यांना मोठी रक्कम मिळेल, असेही स्टालिन म्हणाले.

पन्नीरसेल्वम यांचा पुत्र थेनी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून तेथे कोटय़वधी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त आहे, असे स्टालिन म्हणाले. द्रमुकचे नेते दुराईमुरुगन यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला, त्या संदर्भाने स्टालिन बोलत होते. पोलिसांकडून आलेल्या तक्रारीनंतर हे छापे टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्राप्तिकर विभागाने दिले. मोदी यांच्या निवासस्थानी कोटय़वधी रुपये दडवून ठेवले आहेत, असा आरोप स्टालिन यांनी केला आहे.