पाकिस्तानात छापलेल्या भारतीय बनावट नोटा वितरीत करणाऱ्या एका इसमास दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा इसम मोठ्या टोळीचा सदस्य असावा असा संशय आहे. पश्चिम बंगालमधल्या मालदा इथली टोळी बांग्लादेशमार्गे भारतात बनावट नोटा घुसवत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी 2000 रुपयांच्या दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. मोहम्मद मुमताझ अन्सारी असं आरोपीचं नाव असून त्यानं या नोटा पाकिस्तानात छापल्या असल्याचं उघड केलं आहे.

विशेष म्हणजे या बनावट नोटा अत्यंत चांगल्या दर्जाच्या असून त्या बनावट असल्याचं सर्वसामान्यांना समजणारच नाही इतक्या बेमालूम आहेत. कागद, छपाई, रंग, चिन्हं अशा बाबतीत अत्यंत उच्च दर्जा या नोटांमध्ये राखण्यात आला असून फक्त काही सुरक्षाविषयक बाबींची यात कमतरता आहे, ज्या सर्वसाधारण माणसाच्या लक्षातही येणारही नाहीत. नोटांना तर सीरियल नंबरही फसवे देण्यात आले आहेत. अन्सारी बिहारमधल्या मधुबनीचा रहिवासी असून पोलिस त्याचा कसून तपास करत आहेत.

पाकिस्तानात छापलेल्या व विविध मार्गांनी भारतात धाडण्यात येणाऱ्या बनावट नोटांच्या टोळ्यांच्या मागावर पोलिसांची विशेष तपास पथके होतीच. एका खबऱ्यानं दिलेल्या माहितीचा छडा लावण्यासाठी दोन दिवसांपूर्वी एक पथक स्थापन पोलिसांनी केलं आणि दिल्लीतल्या मिंटो रोडवरील खबर मिळालेल्या जागी त्यांनी छापा मारला. अन्सारी बनावट नोटा देण्यासाठी इथं ठरलेल्या वेळी आला आणि पोलिसांच्या हाती अलगद सापडला.
उत्तर प्रदेशातल्या विटांच्या कारखान्यात आधी अन्सारी कामाला होता. मात्र नेपाळमध्ये भारतीय बनावट नोटा वितरीत करणाऱ्या हाशिम नावाच्या इसमाशी त्याचा परीचय झाला आणि बांग्लादेश व नेपाळमार्गे भारतात बनावट नोटा घुसवण्याच्या धंद्यात अन्सारीही उतरला.

विशेष म्हणजे याच अन्सारीला बनावट नोटांप्रकरणी याआधी अटक झाली होती व शिक्षाही झाली होती. मात्र, बाहेर आल्यावरही त्यानं हेच उद्योग सुरू ठेवले. याआधी अशाप्रकारे अनेक वेळा त्यानं बनावट नोटा दिल्लीमध्ये वितरीत केल्याचं अन्सारीनं सांगितलं. मालदामधून बनाट नोटा आणून तो दिल्लीमध्ये वितरीत करत असतानाच यावेळी पुन्हा जाळ्यात सापडला आणि 2000 च्या नव्या नोटाही बनावट छापण्यात येत असल्याचे उघड झाले.