मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष कमलनाथ हे मूळचे उत्तर प्रदेशचे तर त्यांचे सारे शिक्षण हे कोलकातामध्ये झाले. वास्तविक मध्य प्रदेशशी त्यांचा तसा काहीच संबंध नव्हता. काँग्रेस नेते संजय गांधी यांचे ते डेहराडूनच्या डून स्कूलमधील वर्गमित्र. काँग्रेसच्या राजकारणात संजय गांधी यांचे महत्त्व वाढले आणि कमलनाथ त्यांच्याबरोबरच होते. १९७७ मध्ये काँग्रेसचा उत्तर भारत किंवा हिंदी पट्टय़ात पार धुव्वा उडाला. तेव्हा हिंदी भाषक पट्टय़ातील छिंदवाडा या एकमेव मतदारसंघातून काँग्रेसचे गार्गी शंकर मिश्रा हे निवडून आले होते. १९८० मध्ये काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा निर्माण झाल्याने कमलनाथ यांच्यासाठी छिंदवाडा हा सुरक्षित मतदारसंघ निवडण्यात आला. आधीचे खासदार मिश्रा यांना शेजारील सिवनी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. १९८० पासून १९९६चा अपवाद वगळता नऊ वेळा कमलनाथ हे छिंदवाडातून लोकसभेवर निवडून आले आहेत. छिंदवाडामध्ये त्यांनी आपले साम्राज्यच उभे केले. संजय गांधी यांचे मित्र असले तरी राजीव गांधी, सोनिया व आता राहुल या गांधी कुटुंबीयांतील सर्वाशीस त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास, भूपृष्ठ वाहतूक, पर्यावरण, संसदीय कार्य अशी विविध खाती त्यांनी भूषविली आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने मध्य प्रदेशात आलेले कमलनाथ यांच्याकडे पुढे राज्याचे नेतृत्व आले.

भाजपच्या मतांची टक्केवारी घसरली

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीतील निकाल भाजपसाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांत लोकसभेच्या ६५ जागा आहेत. त्यापैकी गेल्या वेळी भाजपने ६२ जागाजिंकल्या होत्या. मात्र आता विधानसभा निकाल पाहता भाजपला या जागा राखणे कठीण आहे. छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४३. २ टक्के मते मिळाली. गेल्या वेळच्या तुलनेत ती तीन टक्के अधिक आहेत. तर भाजपची मते ४१ टक्क्य़ांवरून ३२.९ टक्के इतकी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४९ टक्के मते मिळाली होती. राजस्थानमध्ये ४५.२ टक्क्य़ांवरून भाजप यावेळी ३८.८ टक्क्य़ांवर आला आहे. तर काँग्रेसची मते ३३ टक्क्य़ांवरून ३९ टक्क्य़ांवर गेली आहेत.  मध्य प्रदेशात विलक्षण चुरस असताना काँग्रेसने गेल्या वेळच्या ३६.४ टक्क्य़ांवरून ४१.४ टक्के मते मिळवली आहेत. तर भाजपची मते गेल्या वेळच्या ४४.९ टक्क्य़ांच्या तुलनेत ४१.३ टक्क्य़ांवर आली आहेत.

एकीकडे मध्य प्रदेशात भाजपला धक्का बसलेला असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. तर विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे प्रमुख नेते अजय अर्जुन सिंह यांना त्यांच्या पारंपारिक चुऱ्हाट मतदारसंघात अनपेक्षितरीत्या धक्का बसला. तिथे भाजपच्या शरदेंदू तिवारी आघाडीवर होते.

छोटय़ा पक्षांना महत्त्व

भोपाळ : मध्य प्रदेशात सत्तेचा लंबक कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपकडे फिरत असताना छोटय़ा पक्षांना सत्ता स्थापनेत कमालीचे महत्त्व आले आहे. त्यामध्ये बहुजन समाज पक्ष दोन समाजवादी पक्ष एक तसेच चार अपक्ष अपक्ष आघाडीवर आहेत. त्यांना सत्ता स्थापनेत महत्त्व आहे.