भाजपा व काँग्रसेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत काँग्रेसला समाधानकारक प्रदर्शन करता आलं नाही. भाजपानं १९ जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजपानं चांगली कामगिरी केली असली, तरी प्रचारात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नातेवाईकाकडूनच त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

भाजपाच्या उमेदवार इमरती देवी या प्रचारावेळी चर्चेतमध्ये आल्या होत्या. इमरती देवी मध्य प्रदेशातील डबरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. इमरती देवी यांना त्यांचे नातेवाईक व काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

आणखी वाचा- पोटनिवडणुकांमध्ये भाजपानं जिंकल्या ५९ पैकी ४१ जागा

इमरती देवी यांनी काही दिवसांपूर्वी इतर काही आमदारांबरोबर काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपात प्रवेश केला होता. इमरती देवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं कट्टर समर्थक समजलं जातं. इमरती देवी यांनी काही महिन्यापूर्वीच शिंदे यांच्याविषयीची निष्ठा व्यक्त करताना म्हटलं होतं की “ज्योतिरादित्य शिंदे यांनी विहिरीत उडी घेतली, तर आपणही त्यांच्यासोबत उडी घेऊ,” असं म्हटलं होतं.

कमलनाथ काय म्हणाले होते?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे. कमलनाथ यांनी डबरा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. याच वेळी कमलनाथ यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. सुरेश राजे आमचे उमेदवार आहेत. सरळ साध्या स्वभावाचे. हे तिच्यासारखे नाहीत. काय नाव आहे? मी काय नाव घेऊ तिचं, आपण तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखता. मी तुम्हाला आधीच सावध करायला हवं होतं की ही आयटम काय आहे?,” असं कमलनाथ म्हणाले होते.