एक चहावाला जर देशाचा पंतप्रधान बनू शकतो. तर मी राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न का पाहू शकत नाही ? हा प्रश्न उपस्थित केला आहे मध्य प्रदेशचे रहिवासी आनंदसिंह कुशवाह यांनी. ते व्यवसायाने चहा विक्रेते आहेत आणि देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याची त्यांची इच्छा आहे. कुशवाह यांनी आतापर्यंत २० वेळा निवडणूक लढवली. प्रत्येकवेळी त्यांचा पराभव झाला आहे. एकीकडे भाजप आणि काँग्रेस राष्ट्रपतीपदासाठी आपले पत्ते अजूनही उघडण्यास तयार नाही. पण कुशवाह यांनी चौथ्यांदा आपली उमेदवारी दाखल केली आहे.

ग्वाल्हेर येथे राहणारे आनंदसिंह कुशवाह हे चहा विक्रेते आहेत. ते १९९४ पासून निवडणूक लढत आहेत. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबरोबरच उपराष्ट्रपतीपदासाठीही निवडणूक लढवली आहे. आपण उत्तर प्रदेशमधील खासदार आणि आमदारांच्या संपर्कात असल्याचे कुशवाह यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’बरोबर बोलताना सांगितले. गत निवडणुकीत आपल्याला जास्त मते मिळाली नव्हती. परंतु, यावेळी मला पाठिंबा मिळेल, असा विश्वास आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान ५० अनुमोदकांची गरज असते. निवडणूक लढवण्यासाठी आव”यक निधीची तरतूद आपण दैनंदिन कमाईतूनच करतो, असे त्यांनी सांगितले.

वर्ष २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कुशवाह यांनी त्यांच्याकडे ५ हजार रूपयांची रोकड आणि १० हजार रूपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. मी प्रचारासाठी वाहनांचा खर्च उचलू शकत नाही. त्यासाठी मी पायी चालतच प्रचार करतो. वर्ष २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीत कुशवाह यांना ३७६ मते मिळाली होती.

पती-पत्नीनेही भरला उमेदवारी अर्ज
राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतर अनेक जणांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यापूर्वी एका पती आणि पत्नीने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरला होता.

राष्ट्रपतीपदासाठी नामांकन प्रक्रिया २८ जूनपर्यंत चालेल. अर्ज पडताळणी दि. २९ जून रोजी होईल. त्यानंतर १७ जुलै रोजी मतदान आणि २० जुलै रोजी मतमोजणी होईल.