मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपा नेत्यांकडून काँग्रेस आमदारांना करोडो रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप केलेला आहे. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फुकटचा पैसा मिळतोय तर घ्या, असं मी आमदारांना म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“आमदारच सांगत आहेत की, आम्हाला एवढे पैसे दिले जात आहेत. मी तर आमदारांना म्हणतोय की फुकटचा पैसा मिळतोय घेऊन टाका” असं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. शिवाय, काही काळजी करण्याचं कारण नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व नरोत्तम मिश्रा यांचे नाव घेत, राज्याला सर्रास लुटणारे आता मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना कोट्यावधी रुपायांची लाच देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलेला आहे. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण गरम झाले आहे.

जेव्हापासून मध्य प्रदेशमध्ये भाजपा विरोधी पक्षात आली आहे. तेव्हापासून शिवराज सिंह चौहान, नरोत्तम मिश्रा व ते सर्व ज्यांनी १५ वर्षांपर्यंत राज्याला सर्रास लुटले, आता काँग्रेस आमदारांना २५ ते ३५ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी तथ्यहीन आरोप करत नाही, शिवराज सिंह चौहन व नरोत्तम मिश्रा यांच्यात एकमत झालं आहे. एकजण मुख्यमंत्री तर दुसरा उप मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ते दोघेही काँग्रेस आमदारांना फोन करत आहेत आणि सर्रास २५ ते ३५ कोटी रुपयांची ऑफर देत आहेत. ५ कोटी आता घ्या, दुसरा हप्ता राज्यसभा निवडणुकीत आणि तिसरा हप्ता हे सरकार कोसळल्यानंतर दिला जाईल, असं सांगितलं जात आहे, असं दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे भाजपाकडून दिग्विजय सिंह यांचे आरोप फेटाळून लावण्यात आलं आहे. अशा प्रकारची खोटी वक्तव्य करून चर्चा निर्माण करायची, ही दिग्विजय सिंह यांची जुनी सवय आहे. कदाचित त्यांना मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करून आपले महत्व वाढवायचे असेल, यासाठी त्यांनी असे विधान केले असेल, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.