कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याची शक्यता आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. धुळवडीच्या दिवशीच मध्य प्रदेशात राजकीय धुळवड पाहण्यास मिळू शकते. भाजपाच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी आज सकाळीच दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली.

ज्योतिरादित्य सिंधिया हे कमलनाथ यांना मुख्यमंत्री केले गेल्यापासूनच नाराज आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेपासून सुरु झालेली काँग्रेसची डोकेदुखी काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. मध्यप्रदेश सरकारमधले १७ आमदार हे बंगळुरु या ठिकाणी गेले आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये ६ मंत्र्यांचाही समावेश आहे. तसंच हे सगळे सिंधिया यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होणार का? धुळवडीच्या दिवशीच राजकीय रंग उधळले जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय घडू शकतं?

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी ११४ जागांसह काँग्रेस सत्तेत आहे. भाजपाच्या १०७ जागा आहे. बसपाच्या २, समाजवादी पक्षाची १ आणि चार अपक्ष आमदार असं सध्याचं राजकीय बलाबल आहे. सध्या मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह २९ मंत्री मंत्रिमंडळात कार्यरत आहेत. त्यामुळे पाच मंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधिया यांना मानणारा गट मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. बंगळुरुला गेलेल्या १७ आमदारांनी जर बंड पुकारलं तर कमलनाथ सरकारला पायउतार व्हावं लागेल. तसं झाल्यास भाजपा सत्ता स्थापनेची संधी सोडणार नाही. आता ज्योतिरादित्य सिंधिया नेमकी काय पावलं उचलणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.

ज्योतिरादित्य सिंधियांनी जर बंडाचा झेंडा पुकारला तर कमलनाथ सरकार कोसळू शकतं. मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होऊ शकतो. या संधीचा फायदा घेऊन भाजपाने ऑपरेशन लोटस राबवलं तर आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही. दरम्यान मध्य प्रदेशात धुळवडीच्या दिवशीच राजकीय भूकंप घडणार की आणखी काही दिवस हे राजकारण रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.