मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येताच काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असतानाच गुना जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. विषप्राशन करुन शेतकऱ्याने आत्महत्या केली असून नागजी भील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नागजी यांनी ४० हजारांचे कर्ज घेतले होते.

गुना जिल्ह्यातील मंडीखेडा गावात राहणारे नागजी भील यांनी सावकाराकडून ४० हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यांना हे कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे सावकाराने नागजी यांची जागा ताब्यात घेतली होती. कर्ज घेताना नागजी यांनी जागा गहाण ठेवली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कर्ज आणि व्याजाची रक्कम असे एकूण ७० हजार रुपये दिल्याशिवाय जागा परत देणार नाही, असे सावकाराने सांगितले होते. यामुळे नागजी हे हताश झाले होते. शेवटी त्यांनी कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली.

शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली. नागजी यांच्या कुटुंबीयांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे. तर गुना येथील खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील नागजी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शेतकऱ्यांनी सरकारी बँकांमधूनच कर्ज घ्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.