महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजपशासित राज्य सरकारे आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असताना, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनावरून राजकारण करू नका, अशा शब्दांत नायडू यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. मध्य प्रदेश ही शांततेची भूमी आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनावरून येथे राजकारण करू नका. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसा भडकवण्याचं काम करू नका, असं ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान दोन ठिकाणी गोळीबार करण्यात आला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकेचा भडीमार केला आहे. त्यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मंदसौरला भेट देणार होते. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. शेतकरी आंदोलनाचे राजकारण करू नका. मध्य प्रदेश ही शांततेची भूमी आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचं राजकारण करू नका, असं माझं काँग्रेसला सांगणं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आडून हिंसा भडकवण्याचं काम करू नका, असं ते म्हणाले.

भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात किमान सहा शेतकरी ठार झाले. पण हा गोळीबार पोलीस किंवा केंद्रीय राखीव पोलीस दलाने केलेला नाही, असा दावा सरकारने केला. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटेनंतर मंदसौरमधील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्यात आली. मात्र गोळीबारात शेतकरी ठार झाल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरल्याने ठिकाठिकाणी शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड तसेच जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे लगेचच हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.