मध्य प्रदेशमधील बरवाणी जिल्ह्यातील सेंधवा तहसीलमध्ये असणाऱ्या डोंडवा गावाजवळ सोमवारी एक कोंबड्या वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये कोंबड्यांचा ट्रक पलटी झाला. आता वर वर पाहता तुम्हाला एखादा साधा अपघात वाटेल मात्र हा अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी गर्दी केली. फक्त ही गर्दी मदत करण्यासाठी नव्हती तर अपघातग्रस्त गाडीमधील कोंबड्या पकडण्यासाठी होती. या ठिकाणी पोहचलेले गावकरी शक्य तितक्या कोंबड्या पकडून घरी घेऊन जात होते. काहींच्या हातात तर तीन ते चार कोंबड्या असल्याचेही चित्र पहायाला मिळाला.

डोंडवाजवळ हा अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि गाडीमधून बाहेर पडलेल्या कोंबड्या पकडू लागले. अनेकांनी तर जास्तीत जास्त कोंबड्या पकडून घेऊन जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्याही आणल्या होत्या. जितक्या शक्य होतील तितक्या कोंबड्या या पिशव्यांमध्ये भरुन नेण्याचा गवाकऱ्यांचा प्रयत्न होता असं फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. काहींनी कोंबड्या घेऊन जाण्याच्या नादात स्वत:च्या मोटरसायकलही या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क केल्या आणि कोंबड्या घरी देऊन आल्यानंतर मोटरसायकल घेऊन गेले.

गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीचा चालक सुना उल्लाह आणि क्लिनर गाडी सरळ कशी करता येईल यासंदर्भात विचार करत होते. तर दुसरीकडे गावकरी मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मैदानावर गाडीमधून बाहेर पडलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी धावपळ करत होते. “गाडीमध्ये एक हजाराहून अधिक कोंबड्या होत्या. मात्र आता केवळ तीनशे साडेतीनशे कोंबड्या उरल्यात,” असं या गाडीचा चालक असणाऱ्या साना याने सांगितलं. या अपघातामध्ये क्लिनरला फारसं काही झालं नसलं तरी चालक साना उल्लाह किरकोळ जखमी झाला आहे.

आणखी वाचा- लाच म्हणून एक किलो पेढे मागणारा पोलीस अधिकारी निलंबित

अपघातानंतर आपण स्थानिक पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र त्यांनी आपल्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही असा दावाही चालकाने केला आहे. “या अपघातामुळे मला दीड ते दोन लाखांचे नुकसान झालं आहे. चांगली मागणी असणाऱ्या देशी कोंबड्या या गाडीमध्ये होत्या,” असंही साना याने म्हटलं आहे.

हा अपघात सेंधवा-खुशालगड राज्य महामार्गावर झाला. हा ट्रक महाराष्ट्रातील मालेगावमधून मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील खिलचीपूर गावामध्ये जात होता. रस्त्यावर आडव्या आलेल्या गायीला वाचवण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पलटल्याचे समजते.