मतमोजणीत पिछाडीवर पडूनही अखेपर्यंत रडीचा डाव खेळणारे विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पेनसिल्वेनियातील २० निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी (सेनेटर) कमला हॅरिस यांनीदेखील इतिहास घडवला आहे. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या असून त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

“अगदी खरं आहे. लोकशाही ही एक स्थिती नाही, ती एक कृती आहे. याचा अर्थ असा की देशातील लोकशाहीची हमी दिली जात नाही. ही तितकीच मजबूत आहे जितकी त्यासाठी आपली लढण्याची इच्छा आहे. म्हणून त्याचं रक्षण करा आणि लोकशाहीला कधीही गृहित धरू नका,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांनी कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ ट्विट करत असा संदेश लिहिला आहे.

आणखी वाचा- इतिहास घडवणाऱ्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं व्यक्तिमत्व जाणून घ्या

कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला

लोकप्रतिनिधी (सेनेटर) कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला आहे. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष आहेत. बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे.
ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत निकालात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही. किमान १० कोटी लोकांनी आधीच मतदान केलं असल्यानं तेथेच बायडेन जिंकल्याचे स्पष्ट झाले होते. कारण अमेरिकेतील प्रशासकीय पातळीवरील अस्वस्थतेमुळे व ट्रम्प यांच्या लहरी कारभाराने मतदार कंटाळले होते. पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर केलेल्या अत्याचारामुळे दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे कृष्णवर्णीयांची मते ट्रम्प यांच्या विरोधात गेली. त्याशिवाय डेमोक्रॅटिक पक्षाने उपाध्यक्षपदासाठी कृष्णवर्णीय कमला हॅरिस यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी केली, तिला यश आले.

पेनसिल्वेनियातील विजयाने बायडेन यांनी २७० चा बहुमताचा आकडा ओलांडला. ट्रम्प यांच्यावर त्यांनी ४० लाखांहून अधिक मतांनी विजय संपादन केला. एकीकडे करोना काळातील ट्रम्प यांचे बेजबाबदार वर्तन, तर दुसरीकडे बायडेन यांचे संयमी आणि जबाबदार वर्तन यात अमेरिकेने बायडेन यांची निवड केली.