सोनिया गांधी यांचा सावध पवित्रा; पवारांच्या विधानांमुळे संभ्रमात वाढ

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही.  शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला  विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली  आहे.  राज्यात सरकार स्थापण्याबाबत शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी १०, जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी हे उपस्थित होते. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती आपण सोनिया गांधी यांना दिली. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही. सोनियांशी दोन्ही काँग्रेसबाबत चर्चा झाली. त्यात शिवसेनेशी आघाडी करून सरकार स्थापण्याचा विषयच निघाला नाही, असे पवार यांनी बैठकीनंतर  स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकार स्थापण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरला असल्याचे सोमवारी दुपारी जाहीर केले होते. पण, असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही, असे सांगत पवारांनी किमान समान कार्यक्रमाची चर्चाच पूर्णत: नाकारली. पवारांच्या या भूमिकेने संभ्रम आणखी वाढला.

काँग्रेस आघाडीतील छोटय़ा पक्षांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. समाजवादी पक्ष, शेतकरी संघटना, जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष, शेकापसह छोटय़ा पक्षांशी आमची निवडणुकीत आघाडी होती. या सर्वाना विश्वासात घेतले जाईल, असेही पवारांनी सूचित केले. पवार यांच्या विधानांमुळे सत्तास्थापना लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.

सोनियांकडून ठोस आश्वासन नाहीच

शिवसेनेला पाठिंबा दिल्यास अल्पसंख्याक मतपेढीवर परिणाम होण्याची भीती काँग्रेसला वाटते. त्यामुळे शिवसेनेस पाठिंबा देण्यास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. महाराष्ट्रातील पक्षाचे आमदार आणि काही नेत्यांनी मात्र शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची भूमिका घेतली आहे. ही बाब सोनिया गांधींना रुचलेली नसल्याचे मानले जाते. आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सोनियांनी या नेत्यांची कानउघाडणीही केली. सरकार स्थापण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलाच तर सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेसचा नकार आहे. मात्र, काँग्रेस सत्तेत सहभागी न झाल्यास सरकारला स्थैर्य येणार नाही, अशी पवार आणि शिवसेनेची भूमिका आहे. यामुळे स्वपक्षीय आमदारांचा दबाव आणि दुसरीकडे बिगरभाजप सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली नाही, असे खापर फुटण्याची भीती अशा कोंडीत काँग्रेस सापडली आहे.

शिवसेनेत चलबिचल : शरद पवार-सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा ठाम विश्वास राऊत यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केला. मात्र, शिवसेनेला सत्तास्थापनेची घाई झाली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून चर्चेचा घोळ घालण्यात आल्याने सेना नेतृत्वाची चलबिचल सुरू झाली आहे. लवकर निर्णय घ्या, अशी सेनेची भूमिका आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चर्चा

सरकार स्थापण्याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली नाही, असा दावा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, पवारांनी काँग्रेस पक्षाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे सुरजेवाला यांनी जाहीर केले.