News Flash

महाराष्ट्रात उत्तर प्रदेशपेक्षा अधिक बेरोजगारी, जाणून घ्या नेमकी आकडेवारी

देशातील बेरोजगारांची संख्या घटली, मात्र १० राज्यांमधली परिस्थिती चिंताजनक

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशातील बेरोजगारी वाढल्यानंतर आता अनलॉकदरम्यान परिस्थिती पुन्हा पुर्ववत होतानाचे चित्र दिसत आहे. देशातील बेरोजगारांच्या संख्येत कमाची घट झाल्याचे चित्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीमधून दिसत आहे. बेरोजगारी कमी झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असलं तरी देशातील १० राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. पर्यटन व्यवसायावर आधारित राज्यामध्ये बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण हे उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक असल्याचे दिसत आहे. सीएमआयईच्या अहवालासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

हरयाणामध्ये १९.१७ टक्के लोकं बेरोजगार अशून त्या खालोखाल राजस्थानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १५.३० टक्के तर दिल्लीत १२.५ टक्के इतके आहे. निवडणूक असणाऱ्या बिहारमध्ये बेरोजगारांची संख्या ११.९ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे डोंगराळ प्रदेशांमधील राज्यांमध्येही बेरोजगारांचे प्रमाण अधिक असल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ टक्के तर उत्तराखंडमध्ये सर्वाधिक म्हणजेच २२.३ टक्के लोकं बेरोजगार आहेत. त्याचबरोबर त्रिपुरामध्ये १७.४ टक्के, गोव्यात १५.४ टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये १६.२ टक्के लोकं बेरोजगार आहेत असं सीएमआयईच्या सप्टेंबरच्या अहावालामधून समोर आलं आहे.

सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीची देशभरामध्ये चर्चा आहे. याच बिहारमधील ११.९ टक्के लोक बेरोजगार आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने बेरोजगारी हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा असल्याचे सांगत यावरुन राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सत्तेत आल्यानंतर १० लाख रोजगार देणार असल्याचेही आरजेडीने सांगितलं आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही बेरोजगारीची संख्या दुहेरी आकडेवारीच्या आसपास आहे. बंगालमध्ये ९.३ टक्के तर पंजाबमधील ९.६ टक्के लोकांच्या हाती काहीच काम नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. झारखंडमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ८.२ टक्के आहेत. महाराष्ट्रामध्ये ४.५ टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये ४.२ टक्के जनता बेरोजगार आहेत. ओदिशामध्ये सर्वात कमी म्हणजेच २.१ टक्के लोक बेरोजगार आहेत.

अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही मागणी पुरेश्या प्रमाणात नसल्याने रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशातील अनेक औद्योगिक शहरांमध्ये करोनाचा पूर्वी ज्या पद्धतीने काम केलं जात होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरु झालेले नाही. करोनामुळे इतर अन्य प्रकारेही बेरोजगारी वाढल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसणे ही सुद्धा मोठी समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

करोना लॉकडाउनमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटन व्यवसाय पूर्वीप्रमाणे पूर्ण जोमाने सुरु होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर दिल्ली-एनसीआरसारख्या शहरी भागांमध्ये बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. देशातील वाहतूक, मनोरंजन, रिटेल आणि हॉटेल उद्योग करोनापूर्व काळाप्रमाणे सुरु झालेले नाहीत. त्यामुळेच अनलॉकमध्येही अनेक राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:45 am

Web Title: maharashtra is ahead of uttar pradesh in unemployment rate says cmie data of september scsg 91
Next Stories
1 दसरा-दिवाळी स्पेशल : आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स
2 आमची माती आमचं हिंग; आत्मनिर्भर होत भारत करणार इतक्या कोटींची बचत
3 देशभरात २४ तासांमध्ये ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित, ५८७ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X