देशभरासह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्याप थांबलेला नसला तरी, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा राज्यात करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून आली. दिवसभरात राज्यात १३ हजार ७०२ नवे करोनाबाधित आढळले तर, १५ हजार ४८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा रिकव्हरी रेट ७९.६४ टक्क्यांवर पोहचला आहे.

याशिवाय राज्यात आज ३२६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १४ लाख ४३ हजार ४०९ वर पोहचली आहे. यामध्ये २ लाख ५५ हजार २८१ अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ११ लाख ४९ हजार ६०३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३८ हजार ८४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

सद्यस्थितीस राज्यात २२ लाख ९ हजार ६९६ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २७ हजार ९३९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमून्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ (२०.२९ टक्के)नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.