राज्यात मागील काही दिवसांपासून एपीआय सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाने महाविकासआघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. हा मुद्दा आज लोकसभेत देखील गाजला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना सभागृहाच्या लॉबीमध्ये धमकी दिल्याचा त्यांनी आरोप त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून केला आहे.

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस मी पाहतो आणि तुला देखील तुरूंगात टाकू.” अशी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात केलेला आहे.

खासदार नवनीत राणा लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, “वरील विषयाला अनुसरून महाराष्ट्रात सुरू असलेले मनसुख हिरेन हत्याकांड व एपीआय सचिन वाझे प्रकरणाबाबत, तसेच माजी पोलीस आयुक्तांच्या पत्राच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. हे प्रश्न मी सभागृहात ठाकरे सरकारविरोधात मांडले, त्यानंतर एक महिला खासदार असल्याच्या नात्याने या लोकशाहीप्रमाणे महाराष्ट्रातील बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्थेवर मी प्रश्न उपस्थित केल्याने, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला, तू महाराष्ट्रात कशी फिरतेस, मी पाहतो आणि तुला देखील तुरूंगात टाकतो. अशी धमकी दिली आणि या अगोदर शिवसेनेच्या लेटरहेडवर,फोनवर आणि माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी मला अनेकदा मिळालेली आहे.”

खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप

“आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा केवळ माझा अपमान नाही तर माझ्याबरोबरच देशभरातील महिलांचा अपमान त्यांनी केला आहे. त्यामुळे खासदार सावंत यांच्यावर कठोरातील कठोर पोलीस कारवाई केली जावी अशी मी मागणी करते.” असं देखील या पत्रात म्हटलेलं आहे.

तसेच, या पत्राच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पाठवली आहे, असं त्यांनी पत्राच्या खाली उल्लेख केलेला आहे.