महेंद्र राजपक्षे यांचा नव्या पक्षाशी घरोबा

श्रीलंकेतील राजकीय संघर्षांला रविवारी नवे वळण लागले. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी पंतप्रधानपदी नियुक्त केलेले महेंद्र राजपक्षे यांनी श्रीलंका फ्रीडम पार्टीशी फारकत घेत नव्या श्रीलंका पीपल्स पार्टीत (एसएलपीपी) प्रवेश केला.

राजपक्षे यांनी रविवारी श्रीलंका पीपल्स पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. राजपक्षे यांचे वडील डोन अल्विन राजपक्षे हे १९५१ साली स्थापन झालेल्या श्रीलंका फ्रीडम पार्टीचे  संस्थापक सदस्य होते. मात्र, पाच दशकांनंतर राजपक्षे यांनी या पक्षाची साथ सोडत नव्या पक्षात प्रवेश केला.

‘अध्यक्षांचे आदेश पाळू नका’

अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांचे आदेश पाळू नका, असे आवाहन श्रीलंका पार्लमेंटचे सभाध्यक्ष कारू जयसूर्या यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे. सिरिसेना यांनी लोकप्रतिनिधींचे अधिकार हिरावून घेतले आहेत, असेही जयसूर्या यांनी म्हटले आहे.