देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे. अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी महिंद्रा अँड महिंद्रा पहिलीच भारतीय कंपनी ठरणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात डेट्रॉयटमध्ये उत्पादन केंद्र सुरु करणार आहे. अमेरिकेचा समावेश जगातील महत्त्वाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठांमध्ये होत असल्याने या देशात विस्तार करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने अमेरिकेत १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून २.५ अब्ज डॉलरचा महसूल मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे. कंपनीच्या अमेरिकेतील उत्पादन केंद्रामुळे ३ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हा आकडा दुप्पट करण्याची कंपनीची योजना आहे. ‘यंदाच्या वर्षात उत्पादन केंद्र सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. डेट्रॉयटमध्ये एका भारतीय कंपनीने उत्पादन केंद्र सुरु करणे ही मोठी गोष्ट आहे,’ असे कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्रासोबत बोलताना म्हटले. कंपनीकडून अमेरिकेतील उत्पादन केंद्रात ऑफ रोड वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. या वाहनांचे डिझाईन कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील तंत्रज्ञान केंद्रात तयार केले जाणार आहे.

‘अमेरिकेतील उत्पादन केंद्रात यंदाच्या वर्षात ऑफ रोड श्रेणीतील हजार वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. अमेरिकेत ऑफ रोड श्रेणी विशेष समजली जाते. मात्र या वाहनांना द्रुतगती महामार्गांवर प्रवेश मिळत नाही,’ अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी दिली. या महिन्याच्या अखेरपर्यंत महिंद्रा समूह आलिशान इलेक्ट्रिक स्पोर्ट्स गाड्यांच्या लॉन्चबद्दल अंतिम निर्णय घेणार आहे. पिनिनफरीना ब्रँड अंतर्गत या गाड्यांचे लॉन्चिंग करण्याचा महिंद्रा समूहाचा विचार आहे.