लोकांना टाळ्या वाजवायला सांगून, दिवे किंवा मोबाइल टॉर्च लावण्याचं आवाहन करुन करोनाचं संकट कमी होणार नाही. त्यासाठी चाचण्या वाढवणं आवश्यक आहे अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. इतकंच नाही तर PM CARES फंडवर टीका होत असतानाच आता त्या सगळ्या टीकाकारांमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही भर पडली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोनाग्रस्तांची चिंताच नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भारतात करोनाग्रस्तांच्या चाचण्या इतक्या कमी प्रमाणात का होत आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या देशाच्या तुलनेत पाकिस्तान, श्रीलंका, अमेरिका, जर्मनी, इटली, साऊथ कोरिया या देशांमध्ये करोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. अशा स्थितीत आपल्या देशात करोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर का होत नाहीत असा प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही करोनाचं संकट लक्षात घेऊन चाचण्या वाढवायला हव्यात अशी सूचनाही केली होती आणि त्यावरुन टीकाही केली होती. आता राहुल गांधी यांनीही चाचण्यांची संख्या का वाढवली जात नाही? टाळ्या वाजवून, दिवे लावून काय साध्य होणार आहे असा प्रश्न विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता देशवासीयांशी व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडीओद्वारे त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सगळ्या देशवासीयांनी घरातले दिवे बंद करावेत आणि आपल्या गॅलरीत किंवा घराच्या दारात दिवा, मेणबत्ती पेटवावी. ते शक्य नसल्यास मोबाइलचा टॉर्च ऑन करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आता राहुल गांधी यांनी मात्र दिवे लावून आणि टाळ्या वाजवून समस्या सुटणार नाही अशी टीका केली आहे.