आता पती किंवा पत्नीवर निराधार आरोप करणे किंवा त्यांच्या चारित्र्यावर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करणे महागात पडू शकते. पत्नीने पतीवर केलेले आरोप सिद्ध होऊ न शकल्याने कर्नाटक न्यायालयाने पुण्यातील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला घटस्फोटास परवानगी दिली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या सुनावणी दरम्यान म्हटले की, महिलेने आरोप करण्यापूर्वी ते सिद्ध करण्याबाबत विचार केला नाही आणि ते आरोप तिला सिद्धही करता आलेले नाहीत. अशा पद्धतीने वर्गीकृत आणि मोठे आरोप केल्यानंतर ते सिद्ध केले जावेत. अन्यथा अशा पद्धतीचे गंभीर आरोप करणे ही मानसिक क्रूरता मानली जाईल, अशी ताकीद न्या. विनीत कोठारी आणि एस बी प्रभाकर शास्त्री यांनी दिली.

पतीने आपल्या घटस्फोटित पत्नीला उदरनिर्वाहासाठी १० लाख रूपये द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने पतीला दिले आहेत. त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालयाने आपल्या आदेशात या दाम्पत्याच्या मुलाचा खर्च करण्यासाठी साडेसात हजार रूपये देण्याचा निर्णय दिला होता. तो निर्णयही न्यायालयाने कायम ठेवला.

दरम्यान, महिलेने पती हा भांडकुदळ असल्यामुळेच त्याची बंगळुरूतून पुण्याला बदली करण्यात आली होती. त्याचबरोबर पतीने आपल्याला मारहाण करून घराबाहेरही काढले होते, असा आरोप केला होता. पतीला दारूचे व्यसन असून तो भांडणे करतो. एकदा दारूच्या नशेत भांडण केल्यानंतर त्याने समोरच्या व्यक्तीकडून मार खाल्ला होता. त्याचबरोबर त्याचे इतर महिलांबरोबरही अवैध संबंध असून तो त्यांच्यावर पैसे खर्च करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. परंतु, हे सर्व आरोप न्यायालयासमोर सिद्ध करण्यास ती महिला अपयशी ठरली.

या दोघांचा विवाह ५ डिसेंबर २००३ मध्ये कर्नाटकातील बेळगावी येथे झाला होता. वर्ष २००९ पासून दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. पत्नी एकदा माहेरी गेली ती परत आलीच नाही, असा पतीचा आरोप होता. पत्नीने एक याचिका दाखल करत स्वत: व मुलाच्या खर्चासाठी पैसे देण्याची मागणी केली होती. त्यामुळे वैतागलेल्या पतीने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण तिथे ती फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाने घटस्फोटाची याचिका स्वीकारली आणि निर्णय पतीच्या बाजूने दिला.