महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या विमानासंबंधी गुरुवारी काही विशिष्ट स्वरूपाचे नवीन ध्वनिसंदेश मिळाल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे या विमानाबद्दल काही माहिती मिळण्याच्या आशा आता अधिकच दृढ झाल्या आहेत. दरम्यान, या हिंदी महासागरातील या विमानाचे शोधक्षेत्र आणखी कमी करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नौदलाचे विमान सध्या या कामगिरीवर तैनात करण्यात आले असून त्यांना पाण्याखालून विशिष्ट ध्वनिसंदेश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. याआधीही या विमानाचा शोध घेण्यासाठी ज्या भागात जहाजे पाठविण्यात आली होती व त्यांना त्या ठिकाणी काही संदेश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले होते, त्याच ठिकाणी गुरुवारी हे ध्वनिसंदेश प्राप्त झाल्यामुळे विमानाचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता दृढ झाली आहे. विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधून विशिष्ट आवाज येत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
ही शोधमोहीम सुरू असताना गुरुवारी दुपारी हे ध्वनिसंदेश प्राप्त झाले आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या या माहितीची आणखी छाननी करावी लागणार आहे.
सदर विमानाची ब्लॅक बॉक्स शोधणे हे अतिशय कठीण काम होते. बीजिंगला जाणारे सदर विमान आपला मार्ग बदलून हिंदी महासागराच्या दिशेने का वळले, याचा वेध ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून लागेल. ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीचे आयुष्यमान ३० दिवस असते. या पाश्र्वभूमीवर ब्लॅक बॉक्सच्या बॅटऱ्या आता सुकल्या असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.