व्यंगचित्र हे अनेकदा शब्दांचे काम करते असे म्हणतात. मात्र मलेशियात एका व्यंगचित्रकाराला व्यंगचित्र काढल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांना फहेमी रेझा नावाच्या व्यंगचित्रकाराने त्याच्या व्यंगचित्रात विदुषकाच्या रुपात दाखवले आहे. याचमुळे फहेमी रझा या व्यंगचित्रकाराला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला ७ हजार ७०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आपल्या व्यंगचित्रात फहेमी रेझाने पंतप्रधान नजीम रझाक यांच्या चेहऱ्याला पावडर, ओठाला लिपस्टिक आणि भुवया कोरलेल्या विदुषकाप्रमाणे दाखवले आहे. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तातडीने याची दखल घेत व्यंगचित्रकार फहेमी रेझाला अटक करण्यात आली आणि त्याला दंडही ठोठावण्यात आला.

सियाहरेदझान योहान हे फहेमी रझाचे वकील आहेत त्यांनी ही कारवाई अनपेक्षित असल्याचे एएफपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. फहेमी रेझाने हे व्यंगचित्र २०१६ मध्ये काढले होते ते व्हायरल झाल्याने त्याला शिक्षा देण्यात येते आहे याला काय म्हणायचे असाही प्रश्न योहान यांनी उपस्थित केला आहे. असे असले तरीही फहेमी रझा या व्यंगचित्रकाराला एक महिन्याच्या कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सध्या मलेशियात रझाक यांना प्रचंड असंतोषाचा सामना करावा लागतो आहे. रझाक यांनी आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे तसेच या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात मलेशियात निवडणुकाही होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर स्वतः विरोधात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे काटेकोर लक्ष आहे. तसेच आपण कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे रझाक यांनी म्हटले आहे. रझाक यांच्याविरोधात एका विरोधी पक्षाच्या खासदाराने आवाज उठवला होता आणि बँकिंग क्षेत्रात रझाक यांनी कसे गैरव्यवहार घडवून आणले ते समोर आणले होते. ज्यानंतर त्या खासदाराला ३० महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच त्याला निवडणूक लढण्यासही बंदी घालण्यात आली. आता त्याच प्रमाणे व्यंगचित्रकारावरही कारवाई करण्यात आली आहे.