पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये सर्वाधित रंगतदार सामने भाजपा विरुद्ध तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीपासूनच भाजपानं ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडलेली असताना ममता बॅनर्जी यांनी देखील भाजपाच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. नुकताच ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेमध्ये भाजपाच्या आरोपांना उत्तर देताना मतदारांना अजब सल्ला दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा तर पिकलाच, पण विरोधकांनाही ममता बॅनर्जी यांनी टोला लगावला आहे.

हा तुमचाच पैसा आहे…!

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर पैसा वाटण्याचा आरोप केला. “सुकमामध्ये २१ जवान शहीद झाले. पण सर्व भाजपाचे नेते कोट्यवधी रुपये घेऊन पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी लोकांना निवडणुकांच्या आधी पैसे देण्याचं वचन दिलं आहे. पैसे घ्या, आणि त्यांना मत देऊ नका. हा तुमचाच पैसा आहे. ते किती खोटं बोलतात ते पाहिलंय तुम्ही. १५ लाखांपैकी एकही पैसा लोकांच्या खात्यात जमा झालेला नाही”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपावर गुंडगिरीचा आरोप

“गुंडगिरी करून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी मन, बुद्धी आणि लोकांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. किती लोकांना तुम्ही घाबरवाल? काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा इथे आले. तेव्हा कुणीही त्यांच्या बैठकीला आलं नाही. मग ते दिल्लीला गेले आणि बैठक घेतली. सीआरपीएफला इथे येऊन भाजपाच्या गुंडांच्या मदतीने बूथ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तुम्हाला देशाची लोकशाही संपवायची आहे का?”, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.

“जे डोनाल्ड ट्रम्पनी केलं नाही, ते मोदींनी केलं!”

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चुकीचे मार्ग अवलंबल्याचं विधान केलं. “माझी सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना विनंती आहे की त्यांनी पाहावं कशा पद्धतीने केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये आपल्या लोकशाही अधिकारांचा गैरवापर करत आहे. कशा पद्धतीने ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. लोकांना मारहाण करत आहेत, लोकांची हत्या करत आहेत. त्यांच्या गुंडांच्या आणि बंदुकांच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. हे फार दुर्दैवी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील असं काही केलं नसेल, ते नरेंद्र मोदी करत आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगाल : TMC नेत्याच्या घरात सापडल्या EVM मशिन्स; निवडणूक आयोग म्हणतं, “अधिकारी झोपी गेल्याने…”

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी ६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं. यापुढे १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिल असं अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. २ मे रोजी केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसोबत पश्चिम बंगालचे निकाल देखील जाहीर केले जातील.