पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बुधवारी ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ममतांचे अभिनंदन करत त्या देशाच्या नेत्या असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेश येथे पत्रकारांशी बोलताना कमलाथ यांनी प्रतिक्रिया दिली.

“ममता बॅनर्जी या आज आपल्या देशाच्या नेत्या आहेत. त्या तिसऱ्यांदा लागोपाठ मुख्यमंत्री झाल्या आहेत. आपल्या देशात यापूर्वी कधीही न झालेल्या अशा विधानसभा निवडणुकीत ममता जिंकल्या आहेत. बॅनर्जी यांना केंद्र सरकार, मोदी आणि त्यांचे मंत्री तसेच सीबीआय, ईडी सोबतही लढा द्यावा लागला. या सर्वांना लाथ मारत त्यांनी पळवून लावलं,” असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत ममतांना पंतप्रधानांविरोधात उभ्या राहतील का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर कमलनाथ यांनी त्याला उत्तर दिले. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) योग्य वेळी निवडणुकीसाठी चेहरा ठरवेल असे कमलानाथ यांनी सांगितले.

निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या ‘राजकीय हिंसाचारा’बाबतही कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता ते (भाजप नेते) बंगालमध्ये हिंसाचार होत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंसक मार्ग स्वीकारणे खूप चुकीचे आहे. मी बॅनर्जी यांच्याशी फोनवरही बोललो आहे आणि त्यांनी सर्वांना हिंसाचारापासून दूर राहण्यास सांगावे असे सांगितले आहे,” असे कमलनाथ यांनी सांगितले. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्य प्रदेश येथे आमंत्रित केले असल्याचे सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेचच सूत्रं हातात घेत पोलीस प्रशासनात मोठे बदल केले. करोना संकट नियंत्रणात आणण्याला सरकार प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.