News Flash

चिदम्बरम यांच्यासोबतची बैठक रद्द करून ममता बॅनर्जी माघारी

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी येथे झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांचा राग अद्याप शांत झालेला नाही. या घटनेचा अप्रत्यक्षपणे निषेध करण्यासाठी केंद्रीय

| April 11, 2013 05:24 am

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी येथे झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांचा राग अद्याप शांत झालेला नाही. या घटनेचा अप्रत्यक्षपणे निषेध करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्यासोबत बुधवारी संध्याकाळी होणारी बैठक रद्द करून त्या प. बंगालला परतल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतची बैठकही त्यांनी मंगळवारी संध्याकाळी रद्द केली होती.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचा नेता सुदीप्ता गुप्ता याचा गेल्या आठवडय़ात पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर डाव्या संघटना व पक्ष कमालीचे संतप्त झाले आहेत. याचा फटका ममता व त्यांचे अर्थमंत्री अमित मित्रा यांना मंगळवारी बसला. येथील नियोजन आयोगाच्या कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या ममता व मित्रा यांना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी या कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीत ६५ वर्षीय मित्रा हे जखमी झाले व त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.  ममता बॅनर्जी याही अंगदुखी आणि श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे कोलकाता येथील खासगी रुग्णालयात काही काळ  दाखल झाल्या होत्या.
यामुळे कमालीच्या संतापलेल्या ममतांनी पंतप्रधान कार्यालयाला दूरध्वनी करून पंतप्रधानांसोबतची बैठक प्रकृतीच्या कारणास्तव आपण रद्द करत असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी ममता यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती, ममता यांच्या निकटवर्तीयांनी दिली. या घटनेवर चर्चा करण्यासाठी बुधवारी ममता यांनी चिदम्बरम यांच्यासोबत एक बैठक आयोजित केली होती, तसेच त्यानंतर त्या पत्रकार परिषदही घेणार होत्या. मात्र, बुधवारी सकाळी त्यांनी हे दोन्ही कार्यक्रम रद्द करून प. बंगालला जाणे पसंत केले.
या घटनेचा निषेध करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जंतरमंतर येथे निदर्शने करण्यात आली. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी ममता व अन्य तीन मंत्र्यांवर प्राणघातकी हल्ला करण्याच्या हेतूनेच हा प्रकार केला. विद्यार्थ्यांनी हा घेराव घातल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्यात तथ्य नाही, या जमावात ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे भाडोत्री गुंड होते, असा खळबळजनक आरोप तृणमूलचे खासदार सुखेंदूशेखर रॉय यांनी या वेळी केला. तृणमूलचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांवर व कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा कांगावा डावे पक्ष करत आहेत, मात्र प. बंगालमध्ये ३४ वर्षांच्या त्यांच्या राजवटीत तब्बल ६० हजार निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले, हे त्यांनी विसरू नये, असेही ते म्हणाले.
केंद्रीयमंत्र्यांकडूनही निषेध
मनीष तिवारी व कमलनाथ या केंद्रीयमंत्र्यांनीही या घटनेचा निषेध केला. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार निंदाजनक व निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी व्यक्त केली. हा प्रकार अतिशय दुर्दैवी होता, कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वर्तनात अथवा वक्तव्यात हिंसेला थारा देऊ नये, असे आवाहन मनीष तिवारी यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2013 5:24 am

Web Title: mamta gone back after cancelling meeting with chidambaram
टॅग : Politics
Next Stories
1 आराक्कोणमजवळ रेल्वेगाडी घसरून १ ठार, ३३ जखमी
2 थॅचर यांना आदरांजली वाहण्यासाठी ब्रिटिश संसदेचे विशेष अधिवेशन
3 खवळला कोरिया!
Just Now!
X