लग्न सोहळयात फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून वहाऱ्डी मंडळींनी केलेल्या मारहाणीत एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आसामच्या नालबारी जिल्ह्यात मंगळवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. नवरदेव आणि त्याचे कुटुंबिय पोहोचण्याआधी फटाके फोडण्यावरुन वाद झाला. त्यावेळी नवरीमुलीकडच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जतीन दास (३५) यांचा मृत्यू झाला.

जतीन दास यांनी फटाके फोडण्यावर आक्षेप घेतला त्यावरुन वादाला सुरुवात झाली असे पोलिसांनी सांगितले. जतीन दास नवरीमुलीच्या शेजारच्या घरात रहायचे. रात्री ११.३० च्या सुमारास ज्या घरात लग्न होते त्या घरातील एक लहान मुलगा फटाके फोडत असताना त्याचा हात जतीन दास यांना लागला. त्यावरुन जतीन दास यांनी त्या मुलाला सुनावले व त्याच्या कानाखाली मारली.

त्यानंतर सहाजण तिथे आले व त्यांनी जतीन दासला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली. हा जमावाकडून झालेल्या हत्येचा प्रकार नाहीय. हल्लेखोर सर्व तिथेच राहणारे आहेत. कुठल्या अफवेवरुन त्यांनी हे कृत्य केलेले नाही असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना घडल्यानंतर नवरदेव आलाच नाही त्यामुळे हे लग्न लागले नाही असे पोलिसांनी सांगितले. या भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आमचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे असे मुकालमुआ पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराने ज्यांची नावे घेतली त्या सर्वांना अटक झाली आहे. जतीन दास रोजंदारीवर काम करणारा कामगार होता. घटनेच्यावेळी हल्लेखोर दारुच्या अंमलाखाली होते असे स्थानिक रहिवाशाने सांगितले. दास जेऊन फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी ही घटना घडली.