कीटकनाशकांच इंजेक्शन देऊन पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. तो जिल्हा सरकारी रुग्णालयात नोकरीला आहे. सोमवारी रात्री बंगळुरुमध्ये ही घटना घडली. पतीचे बाहेर दुसऱ्या महिलेबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. त्यावर दीपाने (२४) प्रश्नचिन्ह उपस्थित केले म्हणून वेंकटेशने तिची हत्या केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

वेंकटेश रुग्णालयात डाटा इन्ट्री ऑपरेटरचे काम करतो. पत्नी झोपेमध्ये असताना वेंकटेशने तिला विषारी इंजेक्शन दिले असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. दीपाला रात्री एकच्या सुमारास रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचे आई-वडिलच तिला रुग्णालयात घेऊन गेले असे पोलिसांनी सांगितले.

दीपाच्या वडिलांना वेंकटेशवर संशय होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. तक्रारीच्या आधारावर इजूर पोलिसांनी वेंकटेशला चौकशीसाठी बोलावले. त्याने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली व पत्नी फसवणूक करत असल्याचा उलटा आरोप त्याने केला. वेंकटेश आणि दीपाचे २३ मार्च २०१९ रोजी लग्न झाले होते. तिला पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजल्यानंतर तिने जुलै महिन्यात आपल्या आई-वडिलांना याबद्दल कल्पना दिली.