रस्त्यावर पडलेली दहा रुपयाची नोट उचलताना एक ७२ वर्षीय व्यक्तीने आपले दोन लाख रुपये गमावले. अहमदाबादच्या गांधीनगर सेक्टर ७ मध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली. झहीरुद्दीन शेख बाईकवर असताना दोन जणांनी त्यांना तुमची दहा रुपयाची नोट खाली पडली असल्याचे सांगितले.

झहीरुद्दीन नोट उचलण्यासाठी म्हणून गेले तितक्यात दोघांनी त्यांची बॅग उचलून तिथून पोबारा केला. गांधीनगरमध्ये राहणाऱ्या झहीरुद्दीन शेख यांनी सेक्टर ७ पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवला आहे. त्यांनी सेक्टर १६ मध्ये असणाऱ्या बँकेतून दोन लाख रुपये काढले होते. बँकेतून पैसे काढल्यानंतर झहीरुद्दीन दुचाकीवरुन सेक्टर ७ मध्ये असणाऱ्या त्यांच्या घराच्या दिशेने चालले होते.

त्यावेळी दुसऱ्या बाईकवरुन आलेल्या दोघांनी झहीरुद्दीन यांना त्यांचे पैसे खाली पडल्याचे सांगितले. झहीरुद्दीन यांनी खाली बघितले तेव्हा दहा रुपयाची नोट पडली होती. त्यांनी बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली व पैसे उचलण्यासाठी म्हणून गेले. तेवढया वेळात बाईकवरुन आलेल्या दोघांनी दुचाकीवर ठेवलेली पैशांची बॅग घेऊन तिथून पोबारा केला. यावेळी रस्त्यावरच्या अन्य वाटसरुंनी आरडाओरडा करुन बॅग पळवत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.