सोबत प्रवास करणाऱ्यांच्या बाटलीतील पाणी त्यांच्या परवानगीशिवाय प्यायल्यामुळे एका तरुणाला तिघांनी रेल्वेच्या खिडकीला बांधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये गेल्या शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव सुमित आहे. तो शुक्रवारी रात्री ११ वाजता जबलपूर स्थानकामध्ये एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडीत बसल्यावर त्याने त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांकडील बाटलीतील पाणी त्यांना न विचारता प्यायले. याचा राग डोक्यात धरून तिघांनी सुमितला मारहाण करण्यास सुरुवात केली. रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी सुमितला गाडीबाहेर काढून त्याला डब्याच्या खिडकीला बांधले आणि पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान चालकाने गाडी पुन्हा सुरू केल्याने त्याच अवस्थेत सुमितला पुढील स्थानक इटारसीपर्यंत प्रवास करावा लागला. इटारसी स्थानकामध्ये पोहोचल्यावर तिन्ही आरोपींनी पुन्हा एकदा सुमितला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच सुमितने तिथे उपस्थित असलेल्या काही प्रवाशांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर प्रवाशांनी तिन्ही आरोपींना रोखले आणि सुमितची सुटका केली.
सुमित हा मुंबईत काम करत असून, तो आपल्या गावातून मुंबईकडे परत येत होता. तर तिन्ही आरोपी हे मूळचे पाटण्यातील राहणारे असून, स्पर्धा परीक्षांसाठी मुंबईकडे येत होते. तिन्ही आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2016 रोजी प्रकाशित
न विचारता पाणी प्यायल्यामुळे तरुणाला रेल्वेच्या खिडकीला बांधून बेदम मारहाण
या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-03-2016 at 12:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man tied to a trains window for drinking water