चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी पुढाकार घेत आघाडीच्या बॉलिवूड निर्मात्यांशी पत्र लिहून संवाद साधला आहे. देशातील सर्व निर्मात्यांनी कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक विरोधी कायदा २०१३ कायद्याचे पालन करावे, असे मेनका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच मेनका गांधी यांनी पत्रामध्ये लैंगिक शोषणाची व्याख्याही स्पष्ट केली आहे. शारीरिक लगट, लैंगिक सुखाची मागणी, अश्लिल शेरेबाजी, पॉर्न दाखवणे , अस्वागतार्ह पद्धतीने स्पर्श करणे, शाब्दिक किंवा अशाब्दिक प्रकारच्या लैंगिक वर्तनाचा समावेश लैंगिक शोषणात होतो. त्यामुळे भविष्यात सर्वच निर्मात्यांनी असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. प्रॉडक्शन हाऊसचा कर्मचारी किंवा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचे लैंगिक शोषण झाल्यास त्याला निर्मिती संस्थेचे प्रमुख जबाबदार असतील. हे प्रकार रोखण्यासाठी देशातील सर्व निर्मिती संस्थांनी अंतर्गत कायदे आणि धोरणे निश्चित करावीत. तसेच लैंगिक शोषणाची कोणतीही तक्रार आल्यास त्याचे दस्तावेजीकरण करून त्याची सखोल चौकशी केली जावी, असे स्पष्ट निर्देश मेनका गांधी यांनी पत्रात दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वेन्स्टाइन यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती प्रकाशात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर #MeToo या हॅशटॅगअंतर्गत मोठी चळवळ उभी राहिली होती. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नव्याने ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर मेनका गांधी यांनी देशातील सर्व बड्या निर्मिती संस्थांना हे पक्ष पाठवले आहे. यामध्ये आदित्य चोप्रा, करण जोहर, एकता कपूर, अनुराग कश्यप, विनोद चोप्रा, महेश भट्ट, आमिर खान, शाहरूख खान, सुरज बडजात्या, फरहान अख्तर, अनिल अंबानी , साजिद नादियाडवाला, संजय लीला भन्साळी आणि सुभाष घई यासारख्या मोठ्या निर्मात्यांचा समावेश आहे.