पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिगर भाजपा शासित राज्यांच्या दौऱ्यादरम्यान संयम बाळगला पाहिजे. त्यांनी आपल्या आचरणाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले पाहिजे. त्यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला अनुरुप असायला हवी, असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी लिखित ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीत ते बोलत होते. यावेळी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हेही उपस्थित होते.

पंतप्रधानांना माझा सल्ला आहे की, त्यांनी संयम बाळगत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा बाळगायला हवी, असे मनमोहनसिंग म्हणाले. सध्या काही राज्यांत सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारसभांमध्ये खालच्या स्तराची भाषा वापरली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंग यांनी हा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान म्हणून मी जेव्हा भाजपाशासित राज्यांचा दौरा करत असत. त्यावेळी त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आपल्या दाव्याला दुजोरा देतील. यूपीए सरकारच्या काळात भाजपाशासित राज्यांबरोबर मी कधीच भेदभाव केला नाही, असे ते म्हणाले.

यावेळी २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, मला आशा आहे की, दहशतवादी हालचालींवर लगाम लावण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये योग्य पाऊल उचलले जाईल. काश्मीरमध्ये सध्या जे सुरु आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वातावरण खराब झाले आहे.