गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची मागच्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी प्रथमच अधिकृतरित्या मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याची माहिती दिली. सध्या त्यांच्यावर गोव्यातील निवासस्थानी उपचार सुरु आहेत. उत्तर गोव्यात अलडोना येथे इमर्जन्सी केअर सेंटरचे उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी विश्वजीत राणे आले होते.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोहर पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याची माहिती दिली. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चांगली नाहीय. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे. यात लपवण्यासारखे काही नाही असे राणे म्हणाले. मनोहर पर्रिकरांनी गोव्यातील जनतेची सेवा केली आहे. आता जर त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायाचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे असे विश्वजीत राणे म्हणाले.

मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामकाजात कुठेही अडथळा येत नाहीय असे राणे म्हणाले. मला कुठेही अडथळा आलेला नाही. मी नव्या प्रकल्पांचे उदघाटन करत आहे असे ते म्हणाले. मनोहर पर्रिकर यांच्यावर दिल्लीत एम्समध्ये उपचार सुरु होते. दिल्लीहून विशेष रुग्णवाहिकेने त्यांना गोव्यात आणण्यात आले. मागच्या काही आठवडयांपासून पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसकडून सरकारवर दबाव आणला जात होता. मनोहर पर्रिकर आजारपणामुळे सध्या राजकारणात सक्रीय नसले तरी ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत.