लग्नसराईच्या काळात सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याने लग्नसमारंभ पुढे ढकलण्याची नामुष्की अनेकांवर आली. केंद्र सरकारच्या निर्णयावर संतापही व्यक्त होत आहे. पण योगगुरु रामदेवबाबा यांनी हा निर्णय घेताना भाजप नेमके का चुकले याचे उत्तर दिले आहे.  ‘भाजपमधील अनेक जण हे अविवाहित आहेत. त्यामुळे त्यांना लग्नसराईचा काळ आल्याचे लक्षात आले नसावे’ असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर योगगुरु रामेदवबाबा  यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका लग्नसमारंभांना बसला. यावरुन गदारोळ सुरु होताच केंद्र सरकारने आता लग्नासाठी बँकेतून अडीच लाख रुपये काढण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  भाजपचे नेते अविवाहित आहे,त्यांना लग्नसराईचा काळ लक्षात आला नाही आणि हीच त्यांची चुक होती असे बाबा रामदेव यांनी सांगितले. रामदेव बाबा यांच्या उत्तरावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. लग्नसराईच्या काळात हा निर्णय घेतल्याने नोटाबंदीची तीव्रता वाढली. हा निर्णय १५ दिवस किंवा आणखी एक महिन्याने घेतला असता तर ऐवढा परिणाम झाला नसता असे त्यांनी नमूद केले. नोटाबंदीच्या निर्णयाचा एक फायदा मात्र झाला. आता लोक हुंडा मागू शकत नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला या निर्णयाचे स्वागत झाले. पण नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागल्या आहेत. पैसे काढण्यासाठीही लोकांना एटीएम बाहेर रांगेत ताटकळत राहावे लागते. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आता जनतेमध्ये असंतोष खदखदू लागले आहे. विरोधकांनीही संसदेत नोटाबंदीवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.