आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांना मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्रीपासून नवी दिल्लीमध्ये आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सर्वांची भेटीही घेतल्या आहेत. मराठा समाजाचा मुंबईमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काय काळजी घ्यायला हवी आणि मराठा समाजाच्या मागण्यांमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पुढे कशा पद्धतीने हाताळायची, यावर बैठकींमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबईतील ‘मराठा क्रांती मोर्चा’ची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी, आतापर्यंतच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढून तो यशस्वी करण्यासाठीच्या ‘मोर्चे’बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. यासाठी शुक्रवारी शिवाजी मंदिरात बैठक होत असून, त्यामध्ये मोर्चाचे ठिकाण आणि तारीख निश्चित होणार आहे. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी निघालेल्या मराठा मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो मराठा नागरिक उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व युवतींचाही मोर्चातील सहभाग लक्षणीय होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतील मोर्चा अतिविराट काढण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी कशा पद्धतीने घ्यायची, त्यासाठी केंद्र सरकारकडून काय मदत मिळायला हवी, या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या काही महिन्यांत मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध महत्त्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाचा निवडणुकीत भाजपला फटका बसू नये, यासाठी राजकीय व्यवस्थापन (पॉलिटिकल मॅनेजमेंट) करण्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्याचे समजते. फडणवीस यांनी गुरुवारी रात्री अमित शहा यांची भेट घेतली. तर शुक्रवारी सकाळी ते एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांना भेटले.
केंद्र सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारला १२६९ कोटी रुपयांची मदत केली. त्याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात काय काळजी घेण्यात येते आहे, त्याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली.
टट्टापानी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू असताना एक भारतीय जवान चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्यामुळे त्याला तेथील सैनिकांनी ताब्यात घेतले. चंदू बाबूलाल चव्हाण असे नाव असलेला हा सैनिक मुळचा धुळ्यातील बोरविहिर येथील राहणारा आहे. त्याला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार चव्हाण यांना परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.