14 November 2019

News Flash

मराठी जगत

मायमराठीच्या जोपासनेसाठी व संवर्धनासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा उपक्रम म्हणजे मराठी भाषा, संस्कृती व सामान्यज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धा. दरवर्षी २ ऑक्टोबर- गांधी जयंतीला होणाऱ्या या परीक्षा

| March 17, 2013 12:05 pm

मायमराठीच्या जोपासनेसाठी व संवर्धनासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा उपक्रम म्हणजे मराठी भाषा, संस्कृती व सामान्यज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धा. दरवर्षी २ ऑक्टोबर- गांधी जयंतीला होणाऱ्या या परीक्षा व निबंध स्पर्धा मुख्यत्वे तरुण पिढीसाठी आयोजिल्या जातात. जेणेकरून त्यांना यानिमित्ताने मातृभाषेच्या संपर्कात राहण्याची संधी मिळते. कारण बृहन्महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळा फार कमी संख्येत आहेत. शिवाय वर्तमान परिस्थितीनुरूप मुला-मुलींनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे. दुसरे म्हणजे विविध प्रांतांत तेथील भाषेचा प्रभावही असतोच, कारण ती संपर्काची भाषा असते. अशामुळे स्वाभाविकच मातृभाषेकडे तितकेसे लक्ष पुरविले जात नाही. पालकांची व विद्यार्थ्यांची इच्छा असूनही त्यांना मराठीतून शिक्षणाची संधी मिळत नाही. तेव्हा मंडळाने परीक्षा आणि निबंध स्पर्धाच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध करून दिली तरी बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची संख्या पाहता परीक्षार्थीची संख्या त्या मानाने कमी असते. दरवर्षी सरासरी एक हजार परीक्षार्थी सामील होतात. पाच विभागांत होणाऱ्या परीक्षांमध्ये जरी वयोगट निर्धारित केले आहेत तरीही काही मराठी शिकण्यास इच्छुक व्यक्ती वयाची तमा न बाळगता अगदी पहिल्या परीक्षेत भाग घेतात. यात अनेक अमराठी भाषिकांचाही समावेश असतो. निबंध स्पर्धेसाठी विचारप्रवर्तक विषय देऊन १२ ते १६, १७ ते २० या दोन गटांतील स्पर्धकांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाते. तसेच वरिष्ठांचा गट म्हणजे ३० वर्षे व त्यावरील व्यक्तींसाठीचा गट. या गटासाठी धार्मिक, सामाजिक, राजनीतिक इ. बाबींवर विषय दिले जातात. उल्लेखनीय बाब ही की, ८५ ते ९० वर्षे वयापर्यंतचे स्पर्धक यात उत्साहाने भाग घेतात.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य आणि विविध केंद्रांचे प्रमुख परीक्षार्थी-स्पर्धक संख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करतात. या वर्षी शहर संपर्कप्रमुखांची नियुक्ती केल्याने आगामी काळात केंद्र व परीक्षार्थी संख्या वाढेल, असा विश्वास वाटतो; परंतु यासाठी आपणा सर्वाचे मोलाचे सहकार्य गरजेचे आहे, असे वाटते. तरी या उपक्रमाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व मंडळाची ही मोहीम सार्थ व्हावी यासाठी समस्त बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी हातभार लावावा, असे आवाहन परीक्षाप्रमुख या नात्याने सुभाष वाघमारे यांनी केले आहे.

बडोद्यात गुंतवणूक माहात्म्य
(विपीन प्रधान)
डॉ. ए. आर. बिडय़े मेमोरियल ट्रस्ट व श्री जुम्मादादा व्यायाम मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुंतवणूक : गतकाल आणि आज’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. नीला वेटे व नितीन वेटे या कर व गुंतवणूक सल्लागारांनी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नीला वेटे यांनी पूर्वापार रूढ झालेली, चालत आलेली गुंतवणुकीबद्दलची मध्यमवर्गीयांची मानसिकता वर्णन केली, तर नितीन वेटे यांनी चालू परिस्थितीतील मध्यमवर्गीयांची बदललेली जीवनशैली आणि आर्थिक नियोजनाची महती सांगितली. त्याचप्रमाणे टाळता येणारी व न टाळता येणारी आर्थिक लक्ष्ये यांचे उदाहरण देऊन विश्लेषण केले. भाषणांतर्गत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सर्व उपस्थितांचे स्वागत विपीन प्रधान यांनी केले. श्याम कुलकर्णी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. चंद्रशेखर अग्निहोत्री यांनी आभार मानले.

गायनाचा मासिक उपक्रम
(शिल्पा कुलकर्णी)
मागील १० वर्षांपासून ‘भक्तिमाला’ हा उपक्रम जबलपूर येथे अव्याहतपणे सुरू आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी मराठी/ हिंदी भजन, भक्तिसंगीत एका गायक कलाकाराकडून सादर केले जाते. या उपक्रमाचे सूत्रधार आहेत काशीनाथ परांजपे व संयोजकद्वय आहेत डॉ. क्षमा मांडवीकर व मुरलीधर पाळंदे. शरद आठले, सुबोध मांडवीकर, नयना व सुचेता येवलकर, रोहिणी व सुरेश बेहेरे हे या उपक्रमाचे अन्य प्रमुख सहकारी आहेत. ‘भक्तिमाला’ कार्यक्रमाच्या वार्षिक उत्सवास मकरंद देऊसकर, एस. पी. जबलपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रत्नाकर कुंडले यांना संगीतरत्न म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर भक्तिसंगीताचा कार्यक्रम वनिता वैद्य, मेघा देशपांडे, अक्षय सुळे, भाग्यश्री मेमने, उत्कर्षां पटेल, प्रज्ञा शिदोरे, अपूर्वा दिघाते, कौस्तुभ मुळे यांनी सादर केला. त्यांना धनंजय परांजपे आणि सुमीत सावळापूरकर यांनी साथ केली. असा उपक्रम अन्य शहरांत तेथील कार्यकर्त्यांनी सुरू करावा, असे आवाहन दिलीप कुंभोजकर, कोषाध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली व ‘भक्तिमाला’चे सूत्रधार काशीनाथ परांजपे यांनी केले आहे.

बडोद्यात संगीत दृक्श्राव्य कार्यक्रम
(मुकुंद घाणेकर)
अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या बडोदे येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाने एका नावीन्यपूर्ण, संगीत दृक्श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम महाराणी चिमणाबाई विद्यालयाच्या पवित्र वास्तूत झाला. ‘लक्ष्य फाऊण्डेशन’च्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई, पुणे यांनी लष्करी जीवनातील शूर जवानांची शौर्यगाथा उपरोक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून कथन केली.
कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नरेंद्र पानवलकर व कार्यवाह स्वाती बाकरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून परिचय करून दिला. प्रारंभी बडोद्याचे माजी कर्नल विनोद फळणीकर यांच्या युद्धभूमीवरील अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. आपले परखड, प्रभावी, अनुभवकथन करून त्यांनी लोकांना खिळवून ठेवले. शहीद झालेल्या दीपक आनंदराव पवार व दिवाकर दादुराम फलटणकर या दोन जवानांचा मरणोत्तर सत्कार करण्यात आला. फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही आर्थिक मदत त्यांच्या मातापित्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
यानंतर अनुराधा प्रभुदेसाई यांच्या भाषणास सुरुवात झाली. लक्ष्य फाऊण्डेशनचा हा १५१ वा कार्यक्रम असल्याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. माजी कर्नल विनोद फळणीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा होत असल्याबद्दल आनंदही त्यांनी व्यक्त केला. अनुराधाताईंनी रणभूमीवर, विशेष म्हणजे कारगील येथे आलेले अनुभव, आठवणी श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशची लढाई शूर जवानांनी कशी जिंकली याचाही परामर्श त्यांनी घेतला. आपल्या वक्तव्यातून त्यांनी अनेक वीरांच्या शौर्यकथा सांगितल्या. प्रत्येक वर्षी २६ जुलैला आम्ही कारगीलला भेट देऊन तेथील जवानांना भेटतो, त्यांना अभिवादन करतो, या गोष्टीचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘सैन्यदलात या, देशाची खऱ्या अर्थाने सेवा करा, फक्त स्वत:च्याच सुखाचा विचार करू नका,’ असा मौलिक सल्ल त्यांनी आपल्या भाषणात विनम्रपणे दिला. शेवटी वीरगती प्राप्त झालेल्या सर्व जवानांसाठी दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

First Published on March 17, 2013 12:05 pm

Web Title: marathi cultural programme held in different state