भारताने दहशतवादी गटांना काबूत ठेवण्याचे आवाहन पाकिस्तानला केलेले असताना जमात उद दवाचा म्होरक्या व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याने इस्लामाबाद येथे काश्मीर प्रश्नावर भारतविरोधी मोर्चाचे नेतृत्व केले. इतरही अनेक शहरात काश्मीर प्रश्नी मोर्चे काढण्यात आले.
हाफिझ सईद याने इस्लामाबादेत तर त्याचा नातेवाईक हाफिज अब्दुर रहमान माकी याने लाहोरला मोर्चा काढला होता.
फैसलाबाद, कराची, पेशावर, मुझफ्फराबाद येथेही काश्मीर दिनी मोर्चे काढण्यात आले. हाफिझ याने कालच भारतात पठाणकोटसारखे आणखी हल्ले करण्याची धमकी दिली होती.
काश्मिरी लोकांना पाठिंबा दाखवण्यासाठी पाकिस्तान मुस्लीम-लीग-नवाझ व जमात-ए-इस्लामी व इतर राजकीय पक्ष व धार्मिक गटांनी यांनीही मोर्चे काढले होते. जमात-उद-दवाने लाहोर येथे काश्मिरात होत असलेले अत्याचार मोठय़ा पडद्यावर दाखवून भावना भडकावल्या. मीरपूर येथे काल काश्मीर परिषदेत सईद याने सांगितले होते, की काश्मीरचा दहशतवादी नेता सय्यद सलाहउद्दीन याचे पाकिस्तानने आभार मानले पाहिजेत कारण त्यानेच पठाणकोटचा हल्ला केला होता. तो पाकिस्तानचा खरा हितचिंतक आहे व त्याने जबाबदारी स्वीकारून पाकिस्तानची सुटका केली.