करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पुन्हा दोन आठवड्यांनी सशर्त लॉकडाउन घेण्यात आला आहे. तिसऱ्या लॉकडाउनचा कालावधी चार मे पासून १७ मे पर्यंत आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये देशाची विभागणी करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शिका प्रसिद्ध करत रहिवाशांना सूट दिली आहे.

ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधील प्रमुख आर्थिक व्यवहारांना सशर्त परवानगी देताना रेड झोनमध्ये मात्र निर्बंध वाढवण्यात आले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे मात्र देशभरात बंधनकारक आहे. लॉकडाउन वाढवताना केंद्रानं अनेक गोष्टींमध्ये सूट दिली आहे. यामध्ये रखडलेल्या विवाहसोहळ्यांचाही विचार करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात लग्नांसाठी उत्सुक असणाऱ्यांना सशर्त सूट देण्यात आली आहे. यामधील महत्वाची अट म्हणजे वर आणि वधू या दोन्ही कुटुंबाकडून एकूण ५० व्यक्तींनाच विवाहाला हजेरी लावता येईल. तसेच सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क बंधनकारक आहे. दुसरीकडे, अंत्यविधीसाठी मात्र अगोदरप्रमाणेच केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.