अमेरिकेतील अनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयातच हा गोळीबार झाला. वॉशिंग्टनच्या पश्चिमेस हे शहर आहे. याप्रकरणी एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.

कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक ठार झाले आहेत.

जेव्हा तुम्ही डेस्कच्या खाली असता आणि तुम्हाला लोकांवर गोळीबार होत असल्याचे आणि बंदुकधारी व्यक्ती गोळ्या रिलोड करतानाचा आवाज ऐकू येत असतो, तेव्हा यापेक्षा भयावह काही असू शकत नाही, असे डेव्हिसने म्हटले आहे.

सीबीएस न्यूजने किमान चार लोक ठार झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. कॅपिटल गॅझेटचे कार्यालय एनापोलिसच्या चार मजली इमारतीत आहे. अनापोलिस अमेरिकेतील मेरिलँड राज्याची राजधानी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.