आइस्टाईनच्या थेअरीला चॅलेंज करणारे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी सकाळी पाटणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. वशिष्ठ नारायण सिंह गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर पाटण्याच्या पीएमसीएच रुग्णालयात उपचार सुरु होते.

मृत्यूनंतर वशिष्ठ नारायण सिंह यांच्या पार्थिवाची अवहेलना झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वशिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. वशिष्ठ नारायण सिंह यांनी आपल्या ज्ञानाने संपूर्ण बिहारचे नाव उज्वल केले असे नितीश कुमार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतरही बिहार सरकारने वशिष्ठ नारायण सिंह यांच्या पार्थिवासाठी साध्या रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली नाही.

वशिष्ठ नारायण यांचे पार्थिव रुग्णालयातच जवळपास दीड तास स्ट्रचेरवर होते. पार्थिव घरी नेण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन दिली नाही. त्यांचा भाऊ रुग्णालयाबाहेर वशिष्ठ नारायण यांच्या पार्थिवासोबत बराचवेळ थांबून होता. रुग्णवाहिकेच्या मालकाने पार्थिव भोजपूर येथे घेऊन जाण्यासाठी पाच हजार रुपये मागितले.

रुग्णालयात जिल्हाधिकारी आणि काही नेते पोहोचल्यानंतर पार्थिव घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था झाली. वशिष्ठ नारायण सिंह यांना अलीकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. गुरुवारी अचानक त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.