देशात दलित आणि मागासवर्गीय जनतेवर अन्याय अत्याचार सुरुच आहेत. त्यामुळे भांडवलभांडवलवादी पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखायला हवे : मायावतीवादी राजकीय पक्षांना केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यापासून रोखायला हवे. असे, बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी म्हटले आहे. चंडीगढ येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपावर कडाडून हल्ला केला.


मायावती म्हणाल्या, ज्यावेळी मी राज्यसभेतून राजीनामा दिला, त्याचवेळी मी ठरवले की, आता मला संपूर्ण देशात खास करुन मागासवर्गीय, कामगार, शेतकऱ्यांमध्ये भाजपाच्या चुकीच्या धोरणांबाबत जागृती निर्माण करणार. यासाठी भाजपासारख्या भांडवलवादी पक्षांना केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापासून रोखायला हवे अशी भुमिका त्यांनी मांडली. भाजपाच्या काळात दलितांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. यावरुन भाजपा दलितविरोधी पक्ष असल्याचे सिद्ध होते, मात्र मागासवर्गीयांना प्रलोभने दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी मायावती यांनी केला.

भाजपा सीबीआय आणि ईडीचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे काम करीत आहे. मात्र, भाजपाच्या राज्यात देशाला चुना लावणारे घोटाळेबाज परदेशात जाऊन बसले आहेत. या गोष्टींबाबत जेव्हा मी राज्यसभेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला बोलू दिले गेले नाही. त्यामुळेच मी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे मायावतींनी यावेळी सांगितले.

काँग्रेसवरही निशाणा साधला त्या म्हणाल्या, काँग्रेसने सुरुवातीला मंडल कमिशनचा अहवाल लागू केला नाही. बसपाने यासाठी सुमारे ६ महिने धरणे आंदोलन केले. त्यानंतर व्ही. पी. सिंह सरकारने तो लागू केला. तसेच काँग्रेसने ३ ते ४ दशकं बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर व्ही. पी. सिंह यांच्या सरकारनेच बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला. मात्र, यामुळे भाजपाने तत्कालीन सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

उत्तर प्रदेशात गोरखपूर-फुलपूर लोकसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने बसपाच्या पाठींब्याने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर गुरुवारी बसपा सुप्रिमो मायावती यांनी पहिल्यांदा चंडीगढ जाहीर सभेचे आयोजन केले होते.